नवी मुंबई : रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाल्यांवर केलेल्या कारवाईच्या विरोधात वाशीतील श्रमिक जनता फेरीवाला संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर महिनाभर चाललेल्या सुनावणीअंती न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईचे समर्थन करत त्यांची याचिका फेटाळली आहे. यामुळे वाशी सेक्टर ९ मधील रस्त्याने मोकळा श्वास घेतला आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली शहरातील अनधिकृत बांधकामे तसेच अनधिकृत फेरीवाले यांच्यावर कारवाईचा धडाका सुरु झाला आहे. याचदरम्यान वाशी सेक्टर ९ मधील रस्त्यालगतच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर देखील कारवाई केली होती. अनेक वर्षांपासून या फेरीवाल्यांनी त्याठिकाणी रस्त्याची अडवणूक केली होती. यामुळे सदर रस्ता रहदारीसाठी बंद झाला होता, शिवाय पादचाऱ्यांनाही त्रासाला सामोरे जावे लागत होते. यासंबंधीच्या तक्रारी प्राप्त होवूनही आजतागायत त्याठिकाणी कारवाई झालेली नव्हती. परंतु मुंढे यांनी त्याठिकाणच्या अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करुन रस्ता रहदारीसाठी मोकळा करण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार अतिक्रमण विरोधी पथकाने त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. मात्र या कारवाईच्या विरोधात श्रमिक जनता फेरीवाला संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर गेली महिनाभर सुनावण्या सुरु होत्या. यादरम्यान फेरीवाले व महापालिका यांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने पालिकेच्या कारवाईचे समर्थन करत फेरीवाला संघटनेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे वाशी सेक्टर ९ मधील रस्त्याने कायमचा मोकळा श्वास घेतला आहे. त्याठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा फेरीवाल्यांच्या कायमस्वरुपी हातगाड्या लागलेल्या होत्या. यामुळे सदर मार्गात वाहतुकीला अडथळा होवून अत्यावश्यक सुविधाही पुरवण्यात अडचण निर्माण होत होती. त्याठिकाणच्या गर्दीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले होते. अग्निशमन दलाची गाडी देखील फेरीवाल्यांमुळे घटनास्थळापर्यंत वेळेवर पोहचू शकली नव्हती. याच बाबींची दखल घेत न्यायालयाने महापालिकेच्या कारवाईचे समर्थन केले आहे. (प्रतिनिधी)
पालिकेची फेरीवाल्यांवरील कारवाई योग्यच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2016 02:36 IST