मुंबई : वाहनांवरील नंबरप्लेटवर वाहन नोंदणी क्रमांक ‘दादा, काका, मामा’ या पद्धतीने लिहिण्याचे ‘फॅड’ सध्या राज्यभर आहे. ते नियमबाह्य असल्याने त्याविरोधात परिवहन आयुक्त कार्यालयाकडून कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी १ आॅगस्टपासून विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असून, आरटीओ आणि वाहतूक पोलीस या मोहिमेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे वाहनांवर नियमबाह्य पद्धतीने डोम लाईट लावणाऱ्या चालकांवरही कठोर कारवाई या मोहिमेदरम्यान करण्यात येणार आहे. वाहनचालकांना आरटीओकडून वाहन नोंदणी क्रमांक दिला जातो. फॅन्सी नंबर प्लेट लावणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायकही असते. त्यामुळे नंबर प्लेटवर नियमबाह्य पद्धतीने नंबर दर्शविणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतल्याचे परिवहन आयुक्त सोनिया सेठी यांनी सांगितले.त्याचप्रमाणे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वाहनांवर शासनाच्या परिपत्रकानुसार लाल, अंबर अथवा निळ्या रंगाचा डोम लाईट लावण्यात येतो. मात्र यातही काही अधिकाऱ्यांकडून नियम डावलून अनधिृतपणे हे दिवे वाहनांवर बसविले जातात; आणि त्याचा चुकीचा वापर केला जातो. अशा वाहनांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी ही मोहीम राज्यभर सुरू राहणार असून, यात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
नियमबाह्य नंबर प्लेटवर कारवाई
By admin | Updated: July 24, 2015 02:04 IST