बडनेरा स्थानकानजीकची घटना : वर्धा, पुणे येथील अपहरण, चोरी प्रकरणात समावेशबडनेरा (अमरावती) : अपहरण व चोरी प्रकरणातील आरोपीला रेल्वेतून नेताना त्याने धावत्या रेल्वेतून हातकडीसह पोबारा केल्याची घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजता बडनेरा रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर घडली.राहुल अरुण शेंडे (२६, रा. वरोरा, जि. चंद्रपूर) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरुध्द वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट व पुणे जिल्ह्यातील देवरोड पोलिसात अपहरण आणि चोरीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. सध्या तो वर्धा जिल्हा कारागृहात होता. पुणे जिल्ह्यातील अपहरण प्रकरणात त्याची न्यायालयात सोमवारी पेशी होती. यासाठी वर्धा पोलीस त्याला घेऊन पुणे येथे रेल्वेने गेले होते. तेथून रात्रीला ते पुणे-नागपूर गरीब रथ या रेल्वेनेच वर्धेकडे निघाले होते.त्याच्यासोबत वर्धा पोलिसांचे दोन बंदूकधारी गार्ड होते. यात सहायक पोलीस उपनिरीक्षक सुभाष नेहरे व जमादार रामचंद्र गेडाम यांचा समावेश होता. गाडी बडनेरा स्थानकाच्या काही अंतरावर असतानाच राहुलने शौचास नेण्याची विनंती पोलिसांना केली. पोलीस राहुलला हातकडीसह प्रसाधनगृहात नेत असतानाच राहुलने हाताला झटका मारुन धावत्या रेल्वेतून हातकडीसह उडी घेतली आणि पोबारा केला.ही रेल्वे गाडी बडनेरा स्थानकावर थांबताच सोबतच्या पोलिसांनी परिसरात आरोपीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा शोध न लागल्याने त्यांनी बडनेरा रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली, अशी माहिती बडनेऱ्याचे सहायक पोलीस निरीक्षक यु. व्ही. पाटील यांनी दिली. (शहर प्रतिनिधी)
आरोपी हातकडीसह धावत्या रेल्वेतून पळाला
By admin | Updated: September 17, 2014 00:53 IST