गेल्या काही दिवसांपासून राज्यामधील मराठी आणि इतर भाषिकांमधील वाद अधिकाधिक तीव्र होताना दिसत आहे. तसेच त्यामधून मारहाणीसारख्याही घटना घडत आहेत. दरम्यान, नवी मुंबईमधील वाशी येथील एका महाविद्यालयामध्ये मंगळवारी मराठीत बोलल्याने एका विद्यार्थ्यावर तीन-चार जणांनी मिळून जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण चार आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार ही घटना वाशीमधील एका कॉलेजबाहेर मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास घडली. या प्रकरणातील पीडित विद्यार्थी हा ऐरोलीजवळील एका गावातील रहिवासी आहे. तर मराठीत बोलल्याने या विद्यार्थ्यावर हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव फैजान नाईक असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्याच्यासोबत इतर तीन तरुणांविरोधातही गुन्हा दाखल झालेला आहे.
मारहाण झालेल्या विद्यार्थ्याने सांगितले की, मी कॉलेजबाहेर बोललो असता आरोपी फैजान हा संतापला. त्याने मला मराठीत बोलू नको असे सांगितले. त्यावरून आमच्यात वाद झाला. तसेच बघता बघता त्याचं रूपांतर भांडणात झालं.
दरम्यान, वाद वाढल्यावर आरोपी फैजान नाईक याने आपल्या तीन साथीदारांना घटनास्थळी बोलावले. त्यानंतर या चार जणांनी मिळून या विद्यार्थ्यावर जिवघेणा हल्ला केला. फैजान याने त्याला हॉकी स्टिकने मारहाण केली. तर इतरांनी लाथाबुक्क्यांनी मारले. त्यामुळे पीडित मुलगा गंभीर जखमी झाला. रस्त्यावर विव्हळत पडलेल्या या विद्यार्थ्याला आजूबाजूच्या लोकांनी त्वरित रुग्णालयात दाखल केले. तसेच त्याची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच ही घटना भाषेच्या वादातून घडली की त्यामागे अन्य काही वैर आहे याचाही शोध घेतला जात आहे.