मुंबई : आतापर्यंत नौदलातील युध्दनौकांवर झालेले अपघात हे त्यांच्या कामातील ढिलाईमुळे झाल्याचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यांनी नौदलात चाललेल्या कामावरच एकप्रकारे ठपका ठेवल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आतापर्यंत झालेले अपघात यापुढे होऊ नयेत यासाठी अधिक जबाबदारीने करतानाच युध्दनौका हातळण्याच्या पध्दतीतही बदल केला पाहिजे, असे मतही पर्रिकर यांनी मत व्यक्त केले.मुंबईतील माझगाव डॉकमध्ये बांधण्यात आलेल्या ‘स्कॉर्पिअन’ श्रेणीतील या पाणबुडीचा जलावतरणपूर्व चाचणी सोहळा पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर, मुंख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेवेळी पर्रिकर यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिले. गेल्या काही वर्षात नौदलातील युध्दनौकांना अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याचे प्रमुख कारण काय आणि हे अपघात रोखण्यासाठी काय प्रयत्न केले पाहिजे, असे पर्रिकर यांना विचारले असता, युध्दनौका व्यवस्थित हाताळल्या न गेल्यानेच हे अपघात झाले. त्यामुळे नौदलाने युध्दनौका हाताळण्याच्या कौशल्यात आणखी बदल केला पाहिजे. कामात कोणताही ढिलाईपणा न दाखवता तत्परता आणि सतर्कता दाखविली पाहिजे, असे पर्रिकर म्हणाले. संरक्षण क्षेत्रात प्रगती करतानाच आमच्याकडून अनेक बदल केले जात असल्याचे पर्रिकर यांनी सांगत युपीए सरकारवरही त्यांनी टिकास्त्र सोडले. संरक्षण दलातील उत्पादन मुदतीत पूर्ण न झाल्यास मोठा दंडही आकारला जाईल, असा इशाराही पर्रिकर यांच्याकडून देण्यात आला. लडाखमध्ये चीनकडून सातत्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे पर्रिकर यांना विचारले असता, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अशा घटनांचे प्रमाण फारच कमी झाल्याचे त्यांनी सांगितले. त्या ठिकाणीही व्यवस्था हाताळण्याच्या पध्दतीत लष्कराकडून बदल केले जात असल्याची माहीती त्यांनी दिली.
ढिलाईमुळेच अपघात
By admin | Updated: April 7, 2015 04:39 IST