यदु जोशी, मुंबईमहाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतलेल्या आम आदमी पार्टीने आता या निवडणुकीत स्वच्छ प्रतिमेचे अपक्ष उमेदवार शोधून त्यांचा प्रचार करण्याचे ठरविले आहे. तसेच, ज्या ठिकाणी असे उमेदवार नसतील तिथे ‘नोटा’चा वापर मतदारांनी करावा, असे आवाहन ‘आप’तर्फे करण्यात येणार आहे. ‘आप’च्या राज्य कार्यकारिणीने गेले तीन दिवस मुंबईतील बैठकीत विधानसभा निवडणुकीतील भूमिकेविषयी मंथन-चिंतन केले. ज्या-ज्या मतदारसंघात भ्रष्ट प्रतिमेचे उमेदवार उभे असतील तिथे त्यांच्याविरुद्ध जाहीर सभांचा धडाका लावण्याचा निर्णयही पक्षाने घेतला आहे. असे उमेदवार कोणत्याही पक्षाचे असले तरी त्यांच्याविरुद्ध रान उठविले जाईल, असे ‘आप’च्या राज्य संयोजिका अंजली दमानिया यांनी बुधवारी लोकमतला सांगितले. निवडणुकीतून माघार घेतली असली तरी निवडणूक प्रक्रियेतून आम्ही कुठेही पळ काढणार नाही, असे त्या म्हणाल्या.‘आप’ने ही निवडणूक का लढविली नाही या बाबतचे स्पष्टीकरणदेखील पक्षाचे नेते प्रचारसभांमधून देणार आहेत. या निवडणुकीत आवश्यक असलेली यंत्रणा, पैसा, कार्यकर्त्यांचे जाळे पक्षाकडे नव्हते. आधीच्या चुकीची पुनरावृत्ती आम्हाला करायची नव्हती. आता ‘मिशन विस्तार’द्वारे कार्यकर्त्यांचे जाळे घट्ट विणले जाईल आणि २०१५ च्या सुरुवातीला होणाऱ्या नवी मुंबई महापालिका निवडणुकीपासून आमचा पक्ष नव्या उमेदीने निवडणूक रिंगणात उतरेल व एकेक निवडणूक लढेल, असे दमानिया यांनी स्पष्ट केले.
‘आप’चा फंडा : अपक्षांना पाठिंबा
By admin | Updated: September 11, 2014 03:15 IST