नागपूर - शेतकरी विरोधी, दलितांवर अत्याचार करणारे व दिवसाढवळ्या खून करणारे हे सरकार असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला. तसेच सरकारने आयोजित केलेल्या चहापानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याचे दानवे यांनी सांगितले.
अंबादास दानवे पुढे म्हणाले की, इव्हीएमच्या आधारावर हे सरकार आलं आहे. सोयाबीन, कापसाला भाव न देणारं हे सरकार आहे, दुधाचे भाव घसरलेले हे सरकार आहे. शेतकऱ्यांची दयनीय अवस्था करणारे हे सरकार असल्याची टीका दानवे यांनी केली आहे. महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न आणि समस्या हे सभागृहात जोरदार ताकदीने मांडणार असल्याची,ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
परभणी येथे संविधानाची विटंबना झाल्यावर उमटलेल्या पडसादानंतर झालेल्या कोंबिग ऑपरेशन दरम्यान अटक केलेल्या सोमनाथ सोमवंशी या तरुणाचा कारागृहात मृत्यू झाला. अशा सर्व घटना घडत असताना मुख्यमंत्री हे मिरवणुकीत गुंतले आहेत, असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. सरकारचे या सर्व घटनांकडे लक्ष आहे की नाही, असा सवाल देखील दानवे यांनी उपस्थित केला.
विजय वडेट्टीवार म्हणाले की, नवीन सरकार आल्यावर विदर्भातील मुख्यमंत्री झाल्यावर तीन आठवड्याचे अधिवेशन असेल, ही वैदर्भीय जनतेची अपेक्षा होती. विदर्भातील जनतेची अपेक्षा होती त्याला हरताळ फासले गेले. सोयाबीनला हमीभाव नाही, धानाला भाव नाही, सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता व्हावी अपेक्षा होती. हे अधिवेशन अधिक कालावधी साठी चालवावे, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली.