उल्हासनगर :
शिवसेना ठाकरे गट शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक गोदुमल कृष्णांनी, प्रवीण कृष्णांनी, हॉटेल व्यावसायिक उदय शेट्टी आदी १५ जणांवर आदिवासी महिलेची जमीन हडप करून बनावट सनद काढल्याचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना गुरवारी रात्री ९ वाजता ताब्यात घेतल्याने, संतप्त शेकडो शिवसैनिक मध्यवर्ती पोलीस ठाण्या समोर एकत्र आले होते.
उल्हासनगर कॅम्प नं-३ विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन येथील अम्ब्रॉसिया हॉटेल शेजारी शारदा वाघरी यांची वडिलोपार्जित ८ हजार ३१२ चौ.मी. क्षेत्रफळाची जागा आहे. सदर जागा हडप करण्याच्या उद्देशाने शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह माजी नगरसेवक गोदुमल कृष्णांनी, प्रवीण कृष्णांनी, तुषार बिंबलकर, सदानंद शेट्टी, उदय शेट्टी, पुरण कुकरेजा, मोहन लक्ष्मणदास, विनोद म्हात्रे, घनशामदास सुंदरदास, जयराम जेठानंद, जानकीबाई शर्मा, मधू गोपाळ खालसा, चंद्रा शेट्टी, अशोक नायर अश्या एकून २५ जणांनी संगनमत करून खोटे कागदपत्र बनवून त्याद्वारे सनद काढली. शिवसेना शाखेत शारदा वाघरी यांना जबरदस्तीने बोलावून कुटुंबासह जिवेठार मारण्याची धमकी देऊन विविध कागदपत्रांवर अंगठे घेतले. तसेच धनादेश दिल्याचे फोटो व व्हिडीओ काढला. असे तक्रारीत म्हटले आहे.
शारदा वाघरी यांच्या नावाने विविध बँकेत खाते उघडून दिलेले चेक वठवून पैशे काढल्याचे फोटो व व्हिडीओ काढल्यानंतर बँकेतून काढलेले पैशे परत घेतले. यानंतर जागेत जेसीबी मशीन आणून घराचे व सामानाचे नुकसान केल्याचे वाघरी यांनी तक्रारीत म्हटले आहे. शारदा वाघरी यांच्या तक्रारी वरून राजेंद्र चौधरी, गोदुमल कृष्णांनी, प्रवीण कृष्णांनी, सदानंद शेट्टी, उदय शेट्टी यांच्यासह १५ जनावर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. विठ्ठलवाडी शिवसेना शाखेत बसलेल्या राजेंद्र चौधरी यांना अचानक गुरवारी रात्री साडे नऊ वाजता पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात चौकशी साठी नेले. चौधरी यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती शिवसैनिकांना मिळल्यावर शेकडो शिवसैनिक मध्यरात्री पर्यंत मध्यवर्ती पोलीस ठाण्या परिसरात एकत्र आले. यामुळे तणावाचे वातावरण शहरात निर्माण झाले.
चौधरी यांची १४ तास चौकशी? आदिवासी महिलेला फसविल्या प्रकरणी चौधरीसह १५ जनावर मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर चौधरी यांना गुरवारी रात्री साडे नऊ वाजता ताब्यात घेऊन शुक्रवारी दुपारी १२ नंतर सोडून देण्यात आले.