नागपूर : २०१४ सालापासून दीड वर्षांत बँक आॅफ महाराष्ट्रशी (बीओएम) संबंधित १०८९ कोटींचे ८९ घोटाळे समोर आले आहेत. यापैकी बँकेचे कर्मचारी सव्वाकोटी रुपयांच्या १४ घोटाळ्यांमध्ये सहभागी आहेत. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे. उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी बँक आॅफ महाराष्ट्रशी संबंधित घोटाळे, एटीएमची संख्या, तेथील सुरक्षा, एकूण खात्यांची संख्या इत्यादींच्या बाबतीत विचारणा केली होती. बँक आॅफ महाराष्ट्रतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०१४ ते ३० जून २०१५ या कालावधीत बँकेशी संबंधित १०८९ कोटी २२ लाख रुपयांचे घोटाळे समोर आले. यातील १४ घोटाळ्यांमध्ये प्रत्यक्ष बँकेतील कर्मचारीच सहभागी होते. या कालावधीत बँकेविरुद्ध रिझर्व्ह बँकेकडे ग्राहकांकडून १०१ तक्रारी करण्यात आल्या तर बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये विविध स्वरूपाच्या ११९१ तक्रारी आल्या. ‘केवायसी’ नियमांचे पालन न केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँकेकडून दीड कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
दीड वर्षांत १०८९ कोटींचे ८९ घोटाळे
By admin | Updated: October 14, 2015 04:15 IST