पुणे : अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीनुसार अधिकाऱ्यांनी बारामती येथील एका गोदामामध्ये छापा टाकला. दूधभेसळीसाठी या पदार्थांची विक्री होत असल्याच्या संशयावरून त्याचे नमुने घेऊन ७६ हजार ९०० रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये व्हे पावडर गोवर्धन, व्हे पावडर कोनाप्रोल व लॅक्टोज या पदार्थांचा साठा विनापरवाना साठविला असल्याचे आढळून आले. बारामतीतील एका गॅरेजमध्ये साठा केल्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं.भा. नारागुडे यांनी सांगितले. याबाबतची अधिक चौकशी केल्यावर हा साठा भिगवण रोड येथील मे. बुऱ्हानी ट्रेडर्स यांच्या मालकीचा असल्याचे आढळले. त्याअनुषंगाने चौकशी केली असता जुमाना फिरोज बारामतीवाला यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी तो साठा नेमका कुठून खरेदी केला तसेच बिले याची माहिती त्यांनी दिली नाही. खरेदी केलेल्या साठ्यापैकी किती साठा कोणाला विकला याबाबत समाधानकारक खुलासा केला नाही. त्यामुळे साठा जप्त केल्याचे नारागुडे यांनी सांगितले. बारामतीवाला यांना काही दिवसांची मुदत देण्यात आली असून, त्या कालावधीत मागितलेली माहिती सादर न केल्यास त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सहायक आयुक्त नारागुडे यांच्याबरोबरच अन्न सुरक्षा अधिकारी अविनाश दाभाडे, नीलेश खोसे, नमुना सहायक जयेश कदम यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बारामतीत दूधभेसळीचा ७७ हजारांचा साठा जप्त
By admin | Updated: April 30, 2016 01:39 IST