खामगाव : अल्पवयीन १४ वर्षीय पुतणीवर बलात्कार केल्याप्रकरणातील आरोपीस सात वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल आज २१ ऑगस्ट रोजी येथील न्यायालयाने दिला. वळती बु. ता.नांदुरा येथील उमेश तुळशीराम कोल्हे (वय ३२) याचा पत्नीसोबत वाद झाल्याने त्याची पत्नी आपल्या दोन मुलीसोबत माहेरी निघून गेली होती. त्यामुळे काका तसेच काकाकडे राहत असलेल्या आजी-आजोबांना चहा, स्वयंपाक बनवून देण्यासाठी उमेशची १४ वर्षीय पुतणी येत होती. दरम्यान उमेशने वासनेच्या भरात नातेगोते विसरुन आपल्या १४ वर्षीय अल्पवयीन पुतणीवर बलात्कार केला तसेच याबाबत कोठे वाच्चता केल्यास जीवे मारण्याची धमकी होती. या धमकीच्या भितीमुळे सदर मुलीने ही घटना आपल्या कुटुंबियांना सांगितली नाही. त्यामुळे उमेशने यानंतरही अल्पवयीन पुतणीसोबत शारीरिक संबंध कायम ठेवले. यामधून तिला चार महिन्याची गर्भधारणा झाली. त्यामुळे कुटुंबीयांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर १८ मे २0१२ रोजी याबाबत पीडित मुलीने पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन गाठून याप्रकरणी फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पिंपळगाव राजा पोलीसांनी उमेश तुळशिराम कोल्हे याच्याविरूध्द कलम ३७६, ५0६ भादंविनुसार गुन्हा दाखल करून उमेश कोल्हे यास अटक केली. यानंतर प्रकरण येथील जिल्हा व सत्र न्यायालयात न्यायप्रविष्ठ केले होते. दरम्यान या प्रकरणात पिडीत मुलगी, डॉक्टर यासह ९ साक्षीदार तपासण्यात आले. या साक्षीपुराव्यावरुन आरोपी उमेश कोल्हे याचेवर गुन्हा सिध्द झाला. त्यामुळे उमेश कोल्हे यास ७ वर्षाची शिक्षा व ५00 रूपये दंड अशी शिक्षा सुनावण्यात आली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम.एम. अग्रवाल यांनी दिला. सरकारी पक्षाच्यावतीने अँड.राजेश्वरी आळशी यांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात आरोपी उमेश कोल्हे याची जामीन न झाल्याने तो अटक केल्यापासून कारागृहातच होता.
** पिडीत अल्पवयीन मुलीची प्रसुती
१४ वर्षीय अल्पवयीन पुतणीसोबत बलात्कारानंतर शारीरिक संबंध ठेवल्याने मुलीला गर्भधारणा झाली होती. पोलिसात तक्रार दिली त्यावेळेस ४ ते ५ महिन्याचा गर्भ होता. यानंतर मुलीने गर्भपात करण्याविषयी मागणी केली असता कोर्टाने गर्भपात करण्यास नकार दिला. नऊ महिन्याच्या कालावधीनंतर सदर मुलीची प्रसुती होवून तिने एका बाळाला जन्म दिला. हे बाळ सद्या बुलडाणा येथील अनाथ आश्रमामध्ये ठेवण्यात आले आहे.