पाचोरा (जि. जळगाव) : सैन्यातील नोकरीच्या आमिषाने लष्करी सुभेदाराने उत्तर महाराष्ट्रातील ३०० जणांना सात कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी नगर येथील सुभेदार हुसनोद्दीन चांदभाई शेख (सुभेदार, इंजिनीअरिंग रेजिमेंट, तवांग) याच्यासह पत्नी रेश्मा व मुलगा वजीरला पाचोरा पोलिसांनी अटक केली आहे.सचिन धनराज शिरसाठ (रा. भास्करनगर, पाचोरा) याने याप्रकरणी पाचोरा पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार, हुसनोद्दीन याने लष्करात नोकरीचे आमिष दाखवून १३ लाख रुपये रोख घेतले व त्याच्या हमीसाठी धनादेशही दिले होते. याप्रकरणी पाचोरा पोलिसांनी वाळकी, ता. जि. नगर येथे जाऊन सध्या सुटीवर आलेला सुभेदार हुसनोद्दीन शेख, मुलगा वजीर व पत्नी रेशमा या तिघांना ताब्यात घेतले. सुभेदार शेख याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. शेख याने एजंटांमार्फत सुमारे ३०० जणांची फसवणूक करून कोट्यवधीची माया जमविली. सन २०१३पासून हा गोरखधंदा सुरू होता.‘एनडीए’साठी २० लाखांचा दर-गुन्ह्याचा तपास सुरू होताच पाचोरा पोलीस ठाण्यात सुमारे ४० तक्रारदारांची गर्दी झाली होती. यात एनडीएसाठी २० लाख, आॅर्डिनन्स फॅक्टरीत अधिकारी म्हणून ५ लाख, सैनिक भरतीसाठी २ लाख असे त्याचे दर होते, अशी माहिती फसले गेलेल्या युवकांनी दिली.
लष्करात नोकरीच्या आमिषाने ७ कोटींचा गंडा, पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 03:15 IST