मुंबई : म्हाडातर्फे धारावी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत सेक्टर-५ मध्ये उभारण्यात आलेल्या १८ मजली पथदर्शी इमारतीत धारावीतील क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना शुक्रवारी दिवाळीच्या मुहूर्तावर सदनिकांचा ताबा देण्यात आला.वर्षानुवर्षे झोपडीत राहत असलेल्या या झोपडीधारकांना व त्यांच्या कुटुंबीयांना थेट ३०० चौरस फूट चटई क्षेत्रफळाच्या अत्याधुनिक सोयी-सुविधांनी युक्त सदनिकेचा ताबा मिळाल्यानंतर गृहस्वप्नपूर्तीचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे यांच्या प्रमुख उपस्थितीत पात्र लाभार्थ्यांना सदनिकेची चावी व ताबापत्राचे वाटप करण्यात आले.या इमारतीत ३०० चौरस फुटाच्या (कार्पेट) ३५८ सदनिका आहेत. मे-२०१६ मध्ये २६६ पात्र निवासी झोपडीधारकांना पुनर्वसन सदनिकेचा ताबा देण्यात आला आहे. १८ आॅक्टोबर रोजी क्लस्टर जे मधील ६५ निवासी पात्र झोपडीधारकांना चिठ्ठी पद्धतीने सोडत काढून सदनिकांचे वितरणपत्र देण्याबरोबरच पात्र झोपडीधारकांना इमारतीतील कुठल्या मजल्यावर कोणत्या क्रमांकाची सदनिका द्यावी, याबाबतचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)माझा जन्म मुंबईचा. धारावीत सुमारे २२ वर्षांपासून वास्तव्यास आहे. पती, मुलगा, मुलगी असे कुटुंब असून रोजगारासाठी एका क्लिनिकमध्ये साफसफाईचे तसेच धुणीभांडीचे कामही करते. महिन्याला सुमारे ५ हजार रुपये पोटापाण्यापुरते मिळतात. अशा परिस्थितीत घराचे स्वप्न दुरापास्त होते. आज हातात घराची चावी मिळाली आणि प्रत्यक्ष घरात आले याचा आनंद आहे.- मंगला मारुती पवार कोल्हापूर जिल्ह्यातील भीमा कोरेगाव हे आमचे मूळ गाव. २५ वर्षांपूर्वी रोजगारानिमित्त पतीसमवेत मुंबईला आले. धारावीतील दहा बाय बाराच्या झोपडीत निवारा शोधला. अनेक वर्षे खडतर जीवन जगल्यानंतर आज पक्क्या घरात आलो आहोत.- शालन रतन गाडेकर
६५ कुटुंबांचा गृहप्रवेश
By admin | Updated: October 29, 2016 02:57 IST