कोल्हापूर : कुणाची सासू त्रास देते, तर कुणाचा नवरा संशय घेतो. प्रेमविवाह झालाय, परंतु सहा महिन्यांतच पटेनासे झालेय. पोक्तपणे न घेतलेल्या निर्णयामुळे संसारात वादळे उठलेली; परंतु या मोडणाºया संसारांना कोल्हापूर जिल्ह्यात विधि सेवा प्राधिकरणांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा मध्यस्थी केंद्राचा आधार मिळालाय. वर्षभरात एक-दोन नव्हे, तर तब्बल ६० जोडप्यांचे संसार मोडता-मोडता सावरले आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यात विधि सेवा प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. विविध न्यायालयांमध्ये प्रलंबित खटले लोकन्यायालयांच्या माध्यमातून मिटविता येतात. मात्र दाखल न झालेले खटले जिल्हा मध्यस्थी केंद्रामध्ये दाखल करवून घेऊन त्यामधून मार्ग काढता येतो. दिवाणी प्रकरणे, कौटुंबिक वाद, वीज मंडळ, पाणी, करविषयक प्रकरणे यामध्ये दाखल करता येतात.कोल्हापूर जिल्ह्यातील या मध्यस्थी केंद्रांमध्ये १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल झालेल्या पती-पत्नी वादांच्या प्रकरणांमध्ये ६० जोडप्यांची समजूत काढण्यात मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांना यश आले आहे. यामध्ये अनेक आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह केलेल्यांचाही समावेश आहे. सासू, जाऊ, भावजय, दीर, नांदायला न गेलेली नणंद आणि मुला-मुलींचे आईवडील यांचा संसारातील वाढता हस्तक्षेप हे भांडणातील मुख्य कारण असल्याचे समोर आले आहे. दोघांचीही समजूत पटली तर त्यांच्याकडून करार करून घेतला जातो. ज्या कारणांवरून भांडणे होतात ती कारणे टाळण्याबाबतचा हा करार असतो. नंतर लोकन्यायालयात संबंधितांच्या सह्या घेतल्या जातात आणि या कराराचा हुकूमनामा होतो. त्याला कुठल्याही न्यायालयात आव्हान देता येत नाही.किरकोळ मुद्द्यांचा बाऊ करून घटस्फोट घेऊ इच्छिणारे अनेक जण असतात; परंतु आम्ही त्यांना मूळ कारणे विचारून समुपदेशन करतो. तुमच्या एका निर्णयाने मुलांचे भावविश्व कसे उद्ध्वस्त होते, हे त्यांना पटवून देतो. भांडणाचे मूळ कारण शोधून त्यावर उपाययोजना करतो. तशी हमी त्यांच्याकडून घेतो. ६० संसार सावरल्याचे मोठे समाधान असल्याचे कोल्हापूर जिल्हा मध्यस्थी केंद्राचे समन्वयक उमेशचंद्र मोरे यांनी सांगितले.
मोडता-मोडता सावरले ६0 संसार!, कोल्हापुरातील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 02:42 IST