नम्रता फडणीस - पुणेअत्याधुनिक तंत्रज्ञानाचा शिरकाव आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात झाला आहे. वैद्यकीय क्षेत्रातही थ्रीडी अॅनिमेशनने प्रवेश केला आहे. त्यातही थ्रीडी अॅनिमेशन म्हटले, की चटकन आपल्या डोळ्यांसमोर येतो, तो चित्रपट. पण शरीरचना शिकवणारा शिक्षक चक्क थ्रीडी अॅनिमेशन वापरून हा अभ्यास आणखी सुलभ करून दाखवत असेल तर..? पुण्यातील डॉ. शौकत काझी थ्रीडी मॉडेलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ‘शरीरशास्त्राचे’ धडे देत आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात असा अभिनव प्रयोग पहिल्यांदाच होत असल्याचा त्यांचा दावा आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘शरीरशास्त्र’ हा विषय तसा किचकट आणि क्लिष्ट. मात्र, हा विषय दृकश्राव्य माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचू शकतो, हे डॉ. काझी यांच्या लक्षात आले. गेली सात वर्षे ते या थ्रीडी अॅनिमेशनवर मेहनत घेत आहेत. त्यातून त्यांनी ‘मेंदू’चे थ्रीडी मॉडेल विकसित केले. आजमितीला त्यांच्या या अॅनिमेशन मॉडेलचे वैद्यकीय क्षेत्रात कौतुक झाले असून, देशातील अनेक वैद्यकीय विद्यापीठांच्या अभ्यासक्रमाचा हे मॉडेल एक भाग बनले आहे.डॉ. काझी याविषयी ‘लोकमत’शी संवाद साधताना म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून माती आणि पीओपीमध्ये साचा तयार करून फायबरमध्ये पोकळ रबराचे मॉडेल बनविण्याचे काम करीत आहे. वैद्यकीय तज्ज्ञ पुरुषोत्तम मानवीकर यांनी ही मॉडेल्स पाहिल्यानंतर हे अॅनिमेशन स्वरूपात करायला पाहिजे, असे सांगून एक प्रकारे मला प्रोत्साहन दिले. तब्बल अडीच वर्षांच्या प्रयत्नांतून ७० मिनिटांचे ‘मेंदूचे’ अॅनिमेशन तयार करण्यात यश आले. या अॅनिमेटेड मॉडेलमुळे मेंदूची अंतर्गत रचना कशी आहे, हे विद्यार्थ्यांना समजावून सांगणे अधिक सोपे झाले आहे. याद्वारे वैद्यकीय विषयांचे आकलन विद्यार्थ्यांना सहजतेने होऊ शकते, असे दिसून आल्याचे काझी म्हणाले.आगामी काळात शरीराचे असे विविध अवयव थ्रीडी मॉडेलमध्ये आणण्याचा विचार आहे. १००० वैद्यकीय तज्ज्ञांना त्यांचे ज्ञान अद्ययावत ठेवणारे आणि रुग्णांनाही त्यांच्या आजाराची स्थिती सांगणारे १००० मिनिटांचे अॅनिमेशन मॉडेल विकसित करण्याचे उद्दिष्ट आहे.‘बी.डी. चौरसियाज’ हे कृष्णा गर्ग यांनी लिहिलेले पुस्तक आशिया खंडात प्रसिद्ध आहे. त्या पुस्तकात अॅक्सेस कोड देऊन थ्रीडी मॉडेलची सीडी पाहण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाणार आहे.१वैद्यकीय अॅनिमेशन ही संकल्पना पाश्चात्त्य देशांप्रमाणे भारतात अद्याप फारशी प्रचलित झालेली नाही. तिचे सुलभीकरण करण्याची गरज आहे. आपल्याकडील एक महत्त्वाचा धागा म्हणजे भारताला आयुर्वेदाची परंपरा लाभली आहे.२सगळ्या गोष्टींचे मूळ आयुर्वेदात सापडते़ त्यामुळे योग आणि आयुर्वेद यांची सांगड घालून आगामी काळात चांगली अॅनिमेशन मॉडेल करण्याचा मानस असल्याचे डॉ. काझी यांनी नमूद केले.प्रचंड मेहनत व संयमाचे काम च्अॅनिमेशन करणे ही अत्यंत खर्चीक बाब आहे. ग्राफिक डिझाइनविषयी फार माहिती नसल्यामुळे ही मॉडेल्स अचूक बनवणे हे फार मोठे आव्हान आहे. च्त्याचा प्रत्येक भाग तयार करताना या विषयातील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून वेळ पडल्यास त्यामध्ये सुधारणाही केली जाते. यासाठी प्रचंड मेहनत आणि संयम या दोन गोष्टींची आवश्यकता आहे, असे डॉ. काझी यांनी सांगितले.
शारीरिक शिक्षणातही ‘थ्रीडी अॅनिमेशन’
By admin | Updated: December 28, 2014 01:28 IST