पुणे : शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासक्रम अधिक गुणवत्तापूर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक व पालकांकडून सूचना मागविल्या होत्या. त्यानुसार राज्यातून ३५९ सूचना प्राप्त झाल्या असून, त्या आधारे आता धोरण ठरविणे सुरू आहे. शालेय अभ्यासक्रमाबरोबर इतरही विषयांची ओळख होऊन विद्यार्थ्यांची दृष्टी चौकस व्हावी यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा महत्त्वाची मानली जाते. ही परीक्षा आता चौथी व सातवीऐवजी पाचवी व आठवी इयत्तेसाठी करण्यात आल्याने चालू शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती परीक्षेचे आयोजन होणार नाही.पुढील शैक्षणिक वर्षात म्हणजे मार्च २०१७ मध्ये परीक्षा होणार आहे. उपलब्ध कालावधीचा वापर करून या परीक्षेत बदल करून सुधारणा करण्याचे परीक्षा परिषदेने ठरविले आहे. त्यासाठी सूचना मागविण्यात आल्या होत्या. परीक्षेत कोणते विषय असावेत, परीक्षेची वेळ, विद्यार्थ्यांचा स्तर आदींबाबत यात मते जाणून घेतली जात आहेत. यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रश्नावली देण्यात आली होती. यात ३५९ सूचना मिळाल्या आहेत. शिष्यवृत्तीच्या संदर्भातून सूचना मागविण्यात आल्या होत्या. कोणत्या सूचना अमलात आणण्यासारख्या आहेत, कोणत्या सूचना गुणवत्तावाढीसाठी उपयुक्त आहेत, याची नोंद करून अहवाल तयार करण्यात येणार आहे. यासाठी किमान ८-१० दिवस लागतील.- स्मिता गौड, उपआयुक्त,महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद
शिष्यवृत्तीतील बदलासाठी राज्यातून ३५९ सूचना
By admin | Updated: October 24, 2015 03:22 IST