टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेतली जाणारी उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा शनिवार दि. २१ पासून सुरु होत आहे. कोकण विभागातून एकूण ३२ हजार ८०९ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. विद्यार्थी संख्येमध्ये रत्नागिरी जिल्ह्याची आघाडी आहे तर शाखांमध्ये वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी असल्याचे दिसून येत आहे.बारावीची परीक्षा शनिवारपासून घेण्यात येणार आहे. यासाठीची आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून याबाबतची माहिती उपलब्ध झाली आहे. कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून १२वीच्या परीक्षेला ३२ हजार ८०९ विद्यार्थी बसणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातून २० हजार ८०७ विद्यार्थी बसत आहेत. जिल्ह्यामध्ये १२ परिरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात करण्यात आली आहेत. जिल्ह्यातील एकूण २७ परीक्षा केंद्रावर हे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधून ११ हजार ९५४ विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार आहेत. यासाठी जिल्ह्यात ८ परिरक्षक केंद्र कार्यान्वित करण्यात आली आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात २० परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली आल्याची माहिती कोकण विभागीय परीक्षा मंडळातर्फे देण्यात आली.शाखानिहाय विद्यार्थी संख्या लक्षात घेता वाणिज्य शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी परीक्षेला बसल्याचे स्पष्ट होते. कला शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातून ६ हजार ५४४ तर सिंधुदुर्गमधून ३ हजार ४०६ विद्यार्थी बसणार आहेत. वाणिज्य शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातून ८ हजार १९३ विद्यार्थी तर सिंधुदुर्गमधून ४ हजार ६७२ विद्यार्थी बसणार आहेत. वाणिज्य शाखेमधून सर्वाधिक १२ हजार ८६५ विद्यार्थी बसणार आहेत. विज्ञान शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातून ५ हजार ३७३ तर सिंधुदुर्गमधून २ हजार ६९५ विद्यार्थी बसणार आहेत. व्यावसायिक शाखेमधून रत्नागिरी जिल्ह्यातील ६९७ तर सिंधुदुर्गमधून ११८१ विद्यार्थी बसणार आहेत. ४८ अतिरिक्त विद्यार्थी या परीक्षेला बसत आहेत.परीक्षांचे संचलन गैरमार्ग मुक्त व्हावे यासाठी दोन्ही जिल्ह्यांमध्ये एकूण १४ भरारी पथके निर्माण केली आहेत. तसेच ५ विभागीय मंडळ सदस्यांना केंद्र भेटीसाठी नियुक्त करण्यात आले आहे.परीक्षा संचलनासाठी आवश्यक त्या सर्व बैठका कोकण विभागीय शिक्षण मंडळाकडून घेण्यात आल्या आहेत. केंद्रप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी, परिरक्षक यांना स्वतंत्र सभा घेऊन गैरमार्ग मुक्त व तणावरहित परीक्षा घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याबाबतची बैठक व्यवस्थाही त्या त्या महाविद्यालयांना कळवण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा ्रकेंद्रावर पोहोचावे, असे आवाहन परीक्षा मंडळातर्फे करण्यात आले आहे. (वार्ताहर)कोकण विभागीय शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या दोन्ही जिल्ह्यांमध्ये परीक्षा तणावरहित वातावरणात घेण्याच्या दृष्टीने संबंधितांना सर्व सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्याने मुक्त वातावरणात परीक्षा देणे आवश्यक आहे. कोकण विभाग गैरमार्ग मुक्त परीक्षा घेण्यात राज्यात अव्वल आहे. यावर्षीही हा बहुमान टिकवण्याच्या दृष्टीने विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचे आवश्यक समुपदेशन करण्यात आले आहे. यामुळे यावर्षीदेखील कोकण राज्य निकालात अव्वल असेल.- आर. बी. गिरी, विभागीय सचिव
३२ हजार विद्यार्थी देणार बारावी परीक्षा
By admin | Updated: February 19, 2015 23:47 IST