मुंबई : तक्रारदार रमेश जाधव यांच्याकडे गंमत म्हणून ३० कोटी रुपयांची लाच मागितली होती, असा हास्यास्पद दावा लाचप्रकरणी अटकेत असलेल्या गजानन पाटील याने चौकशीत केला आहे. विशेष न्यायालयाने पाटीलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा खासगी पीए असल्याचे सांगणाऱ्या गजमल उर्फ गजानन पाटील याला ३० कोटी रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी शुक्रवारी एसीबीने अटक केली होती. तपासात तो सहकार्य करत नसल्याची तक्रार करत त्याच्या पोलीस कोठडीची मुदत वाढवून मिळावी, अशी विनंती एसीबीने विशेष न्यायालयाकडे केली. मात्र, न्यायालयाने ती अमान्य करत त्यास न्यायालयीन कोठडी सुनावली.एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पाटील याचे अनेक मंत्र्यांशी जवळचे संबंध असून, त्याने आणखी किती जणांकडून लाच मागितली आहे, याचा तपास आता एसीबीने सुरू केला आहे. गजानन पाटील याचे फोन डिटेल्स तपासल्यानंतर त्याने मंत्रालयातील अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना फोन केल्याचे एसीबीच्या निदर्शनास आले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांचा ओएसडी (आॅन स्पेशल ड्युटी) उन्मेश महाजन आणि इतर अधिकाऱ्यांशी पाटील याचे जवळचे संबंध आहेत, हे तपासातून उघड झाले आहे. यापैकी पाटील याला कोण सहकार्य करीत होते, याचा तपास एसीबी करणार आहे. ठाण्यातील मागासवर्गीयांच्या शिक्षण संस्थेला भूखंड हस्तांतरित करण्यासाठी पाटीलने विश्वस्तांकडे ३० कोटींची लाच मागितली. ट्रस्टी डॉ. रमेश जाधव यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदवली. त्यावर ही कारवाई करण्यात आली. (प्रतिनिधी)
गंमत म्हणून मागितले ३० कोटी
By admin | Updated: May 18, 2016 05:03 IST