मुंबई : मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या शेरू या श्वानाचा शनिवारी सकाळी परळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्याचे वय १४ वर्षे होते. रुग्णालयाच्या आवारात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शेरू जखमी झाला होता. शेरूला बंदुकीच्या तीन गोळ्या लागल्या होत्या. नशीब बलवत्तर म्हणून त्याचा जीव वाचला होता. जखमी शेरूला वृत्तछायाचित्रकार श्रीपाद नाईक यांनी रुग्णवाहिकेद्वारे पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्या शरीरातील बंदुकीच्या दोन गोळ्या काढल्या होत्या. मात्र एक गोळी श्वसननलिकेत होती. २६/११ पासून शेरू पशुवैद्यकीय रुग्णालयात होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून तो आजारी होता. शिवाय मागील दोन दिवसांपासून त्याने अन्न सेवन केले नव्हते. शनिवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्याचा मृत्यू ओढवला.