मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यभार स्वीकारल्यापासून गेल्या १३ महिन्यांत मुख्यमंत्री साहाय्यता निधीत तब्बल २५३ कोटी जमा झाले आहेत, तर ७६ कोटी रुपयांची मदत विविध गरजूंना देण्यात आलेली आहे.मुख्यमंत्री साहाय्यता निधीत फडणवीस यांच्यापूर्वी आणि ते पदावर आल्यानंतर जमा निधी, खर्च आणि शिल्लक रकमेची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मागितली होती. १ नोव्हेंबर २०१४ पूर्वी मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षात ११ कोटी ६८ लाख ४३ हजार ४७५ रुपये शिल्लक होते. फडणवीस हे मुख्यमंत्री बनल्यानंतर आतापर्यंत २५३ कोटी ५ लाख ३ हजार ७६ रुपये जमा झाले आहेत. मुख्यमंत्री साहाय्यता निधीत कधीही कमतरता पडू नये आणि प्रत्येक गरजूस आर्थिक साहाय्यता करण्यासाठी मुदत ठेव रक्कम ठेवण्यात येते. फडणवीस यांच्यापूर्वी मुदत ठेवीची रक्कम १२४ कोटी ५० लाख ३२ हजार ३४६ रुपये होती. आताही तेवढीच रक्कम असून, त्यात नवीन कोणतीही भर घालण्यात आलेली नाही. मुदत ठेव आणि जमा रक्कम अशी एकूण ३१२ कोटी ९९ लाख ६१ हजार ८०९ रुपये रक्कम फंडात आहे. साहाय्यता निधीचे वितरण करताना योग्य दक्षता घेऊन गरजूंसाठी त्याचा वापर करावा, अशी अपेक्षा गलगली यांनी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)
मुख्यमंत्री साहाय्यता निधीत २५३ कोटी जमा
By admin | Updated: November 28, 2015 01:51 IST