मुंबई : गेल्या २५ वर्षांची शिवसेना-भारतीय जनता पार्टीची युती गुरुवारी सायंकाळी विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावरून अखेर तुटली आणि गेला पंधरवडाभर सुरू असलेली राजकीय अस्थिरता संपुष्टात आली. यामुळे ही विधानसभा निवडणूक भाजपा आता स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पार्टी व शिवसंग्राम या नव्या मित्रांचा हात धरून लढणार आहे तर शिवसेना आपल्या ताकदीवर या निवडणुकीला सामोरी जाईल. रिपाइंचे रामदास आठवले यांना सोबत घेण्याकरिता भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत.लोकसभा निवडणुकीत अनपेक्षित यश मिळाल्याने विधानसभा निवडणुकीत ही महायुती सत्तांतराचा चमत्कार घडवणार, असे तर्क लढवले जात होते. मात्र मुख्यमंत्रिपद व जागावाटप या तिढ्यात ही महायुती गुरफटत गेली. शिवसेनेने आपले ‘मिशन १५०’ घोषित केले होते. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत भाजपाला ११९पेक्षा जास्त जागा देणार नाही, अशी ठाम भूमिका शिवसेनेने घेतली होती. या वादात शिवसेनेकडून वेगवेगळे फॉर्म्युले भाजपा व मित्रपक्षांना सादर केले गेले. कोणत्याही परिस्थितीत आपण आपले मिशन १५० सोडणार नाही, अशी भूमिका शिवसनेने घेतली, तर १३०पेक्षा कमी जागा घेणार नाही, यावर भाजपाचे नेते ठाम राहिले. त्यातून घटकपक्षांची गळचेपी होत असल्यामुळे युतीचे अखेर सूप वाजले.
२५ वर्षांचे युती‘बंधन’ तुटले
By admin | Updated: September 26, 2014 09:15 IST