- बाळासाहेब बोचरेमुंबई : आषाढी वारी कधी येईल अन् पंढरीच्या वारीला कधी जाईन अशी ओढ मनी असलेले वारकरी उशिरा आलेल्या पावसामुळे पेरणीमध्ये गुंतले आहेत. त्यामुळे पायी दिंड्यांमध्ये वारकऱ्यांची संख्या २५ टक्के घटली आहे. मात्र आषाढीला येणारे वारकरी उशिरा का होईना येणारच, असे पालखी सोहळा प्रमुखांचे मत आहे.जून महिन्याच्या प्रारंभाला पडलेल्या पावसानंतर खरीपाची पेरणी करुन शेतीच्या कामातून मोकळा झालेला शेतकरी वारकरी बांधव आषाढी वारीला जाण्याच्या तयारीत असतो. पण यंदा पावसाचे खूपच उशिरा आगमन झाले. त्यामुळे पेरण्या खोळंबल्या. आता पाऊस सुरू झाल्यानंतर पेरणी उरकूनच वारीला जायचे, असे वारक-यांनी ठरविले आहे. पुणे जिल्ह्यातून दोन मुख्य समजल्या जाणाºया पालख्यांपैकी संत तुकाराम महाराज पालखीने २४ जून रोजी तर संत ज्ञानेश्वर पालखीने २५ रोजी पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवले. तोपर्यंत कोकण व पश्चिम महाराष्टÑ वगळता राज्याच्या कोणत्याच भागात पेरणीयोग्य पाऊस झालेला नव्हता.राज्यात खरीपाचे १४०.६९ लाख हेक्टर क्षेत्र असून २४ जूनपर्यंत एक टक्काही खरीपाच्या पेरण्या झालेल्या नव्हत्या. १२ जुलै रोजी आषाढी एकादशी असून तोपर्यंत पेरण्या उरकून वारकरी शेवटच्या टप्प्यात पायी वारीत सहभागी होतील आणि वारकºयांची संख्या वाढेल, असे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी सांगितले. वारीतील सर्वात मोठ्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखीसोबत ५०० दिंड्या असून सुमारे अडीच ते तीन लाख वारकरी सोबत असतात. त्यामध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील दिंड्या जास्त असतात, असे पालखीचे चोपदार रामभाऊ रंदवे यांनी सांगितले.संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासोबत ३०० दिंड्या असून दोन लाख वारकरी असतात. सध्या वारकरी कमी असून उशिरा पावसाचा परिणाम असल्याचे अध्यक्ष मधुकर मोरे महाराज यांनी सांगितले.
पेरण्या न झाल्याने वारकऱ्यांमध्ये २५% घट
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 02:58 IST