ऑनलाइन टीम
मुंबई, दि. २ - मुंबईत मान्सूनने आगमन केले असले तरी बुधवारी मध्यरात्रीपासून मुंबईत २० टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून मुंबई व उपनगरांमध्ये ही पाणीकपात लागू असेल.
यंदा मान्सून तब्बल महिनाभर उशीराने मुंबईत दाखल झाला आहे.मान्सूनने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलाव आणि धरणातील पाण्याची पातळी खालावत होती. तुळशी, मोडकसागर, तानसा, भातसा या चार धरणांमध्ये जूलैपर्यंत पुरेल ऐवढाच पाणीसाठा आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने स्थायी समितीसमोर पाणीकपातीचा प्रस्ताव मांडला होता. बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. बुधवारी मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली असली या आठवडाभरात अपेक्षीत पाऊस न पडल्यास पाणीकपात आणखी वाढवण्यात येईल अशी चर्चा आहे.