मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बेस्टमधून प्रवास करणाऱ्या फुकट्या २७ हजार ६२ प्रवाशांकडून तब्बल २० लाख ३० हजार ८४७ रुपये एवढा दंड जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तीन महिन्यांत वसूल करण्यात आला आहे.बेस्ट प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट गाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध आणि खरेदी केलेल्या तिकिटाने प्रमाणित केलेल्या अंतरापेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. विनातिकीट प्रवास करणे हा सामाजिक गुन्हा आहे. परिणामी, सर्व प्रवाशांनी आपले आर्थिक नुकसान अथवा मानहानी टाळण्यासाठी योग्य तिकीट खरेदी करावे. तसेच तिकिटावर प्रमाणित केलेल्या अंतराएवढाच प्रवास करावा, असे आवाहन बेस्ट प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी प्रवास भाडे अधिक देय असलेल्या प्रवासी भाड्याच्या रकमेच्या दहापट रक्कम भरण्याचे नाकारले तर एक महिना पोलीस कोठडी किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा एकत्रितपणे देण्याची तरतूद आहे. (प्रतिनिधी)
फुकट्या प्रवाशांकडून २० लाखांचा दंड वसूल
By admin | Updated: May 8, 2015 04:22 IST