आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयाला गती : पूरक मागण्यांत मिळाला निधी नागपूर : राज्य सरकारने नागपुरात प्रस्तावित गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयासाठी पुरवणी मागण्यांमध्ये १७ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, अशी माहिती वित्त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेवर निवेदन करताना दिली. संबंधित निधी या प्राणिसंग्रहालयाच्या बांधकामासाठी खर्च होणाऱ्या निधीत येणारी कमी भरून काढण्यासाठी केला जाईल. विधानसभेत सोमवारी वन, महसूल, ग्राम विकास, आरोग्य, जलसंधारण विभागाच्या पूरक मागण्या चर्चेअंती मंजूर करण्यात आल्या. यावेळी मुनगंटीवार म्हणाले, गेल्यावर्षी सरकारने गोरेवाड्यासाठी फक्त एक कोटी रुपये दिले होते. आता सरकारने ते वाढवून १७ कोटी दिले आहेत. या प्राणिसंग्रहालयात जंगल सफारी, आफ्रिकन सफारी, रिसर्च सेंटर, बायो पार्क आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. ताडोबा येथील संजय गांधी नॅशनल पार्क पीपीपी आधारावर पर्यटन क्षेत्राच्या मदतीने विकसित करण्याची घोषणा त्यांनी केली. बांबू उद्योगावर आधारित प्रशिक्षण केंद्रासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
गोरेवाड्यासाठी १७ कोटी
By admin | Updated: December 16, 2014 01:11 IST