मुंबई : मराठवाड्यातील लहानमोठ्या धरणांमध्ये १५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या काही दिवसांतील परतीच्या पावसाने हा पाणीसाठा ८ टक्क्यांवरून १५ टक्के झाला असला तरी दुष्काळाचे सावट मात्र कायम आहे. राज्यातील धरणांमध्ये सरासरी ५६ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी हा साठा तब्बल ७९ टक्के होता. याचा अर्थ पाणीसाठ्याबाबत राज्याची एकूणच अवस्था चिंतित करणारी आहे. पुणे विभागात ६१ टक्के पाणीसाठा आहे. सर्वांत चांगली स्थिती आहे ती कोकणची. तेथे ८८ टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभाग ७० टक्के, अमरावती ७२ टक्के, नाशिक ६० टक्के असे चित्र आहे. मराठवाड्यात गेल्या वर्षी आजच्या दिवशी ४२ टक्के पाणीसाठा होता. सध्याचा १५ टक्के साठा लक्षात घेता दुष्काळाची भीषणता लगेच लक्षात येते. गेल्या वर्षी तब्बल ९१ टक्के पाणीसाठा असलेल्या पुणे विभागातील पाणीसाठा यंदा ३० टक्के घटला आहे. (विशेष प्रतिनिधी)पुणे : मान्सूनने विदर्भातून मागील आठवड्यात परतीचा प्रवास सुरू केला आहे. ३ ते ४ दिवसांत राज्यातून मान्सून माघारी जाईल, अशी शक्यता आहे. दक्षिण गोव्याच्या काही भागांत अल्प काळ मुक्काम करून तो परतेल, त्यामुळे पुढील २४ तासांत पाऊस पडण्याची शक्यता नसल्याचे हवामानशास्त्र विभागाने सांगितले.अरबी समुद्रात सक्रीय झालेल्या चक्राकार वाऱ्याच्या प्रभावाने मान्सूनचा परतीचा प्रवास पुन्हा सुरू झाला आहे. विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांतून परतीचा पाऊस माघारी गेला आहे. सध्या परतीच्या पावसाची सीमा मध्य महाराष्ट्रालगत कायम आहे. मात्र ३ ते ४ दिवसांत महाराष्ट्रातून ८० टक्क्यांहून अधिक मान्सून माघारी फिरणार आहे.
मराठवाड्यात १५ टक्के पाणीसाठा
By admin | Updated: October 13, 2015 04:06 IST