मुंबई: राज्य मार्ग परिवहन (एस.टी.) महामंडळाने राज्यभरात राबविलेलया बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियानात १४९ बसस्थानके स्वच्छता राखण्यात अपयशी ठरल्याने नापास झाली आहेत. राज्यातील एकूण ५६८ स्थानकांपैकी २०१ स्थानकांना ७० पेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या स्वच्छता अभियानात बस स्थानक आणि प्रसाधनगृह, बसस्थानकाचे व्यवस्थापन आणि हरित बसस्थानक अशा निकषांच्या आधारे गुण देण्यात आले आहेत. दर तीन महिन्यांनी स्थानकाची पाहणी करून १०० पैकी गुण दिले जातात. अभियानाचे पहिले सर्वेक्षण झाले असून तीन सर्वेक्षण बाकी आहेत. वर्षाच्या शेवटी राज्यातील तीन गटांतील पहिले क्रमांक काढले जाणार असून, संबंधितांना ३ कोटींची बक्षिसेदेखील देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. पहिल्या सर्वेक्षणामध्ये मुंबई सेंट्रल, कुर्ला नेहरूनगर, परळ आणि दादर या बसस्थानकांनी ‘अ’ गटात तर पनवेल आणि उरण स्थानकांची ‘ब’ गटात स्थान पटकावले आहे. त्यामध्ये स्थानके चकाचक असली तरी डेपो मात्र घाण असल्याचे चित्र आहे.
दिवसभरात ५५ लाख प्रवाशांचा प्रवास एस.टी.ने राज्यभरात दिवसाला तब्बल ५५ लाख प्रवासी प्रवास करतात. महिला सन्मान योजना,ज्येष्ठ नागरिक सवलतीसह राज्य सरकारच्या प्रवास सवलतीमुळे प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु एस.टी.ची आगार, बसस्थानके मात्र बकाल अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्रचंड गैरसोय होते. खासकरून महिला प्रवाशांची परवड होते. प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी महामंडळाने हा उपक्रम राबविला आहे.