जयंत धुळप, अलिबागगंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असलेल्या, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि जे मतदान प्रक्रियेत अडथळा आणू शकतात अशा १३७ गुंडांना हद्दपार करण्यात आले आहे. त्यांना १४ ते १९ आॅक्टोबर या सहा दिवसांसाठी हद्दपार केले आहे. उप विभागीय महसूल अधिकारी व दंडाधिकारी यांनी हे आदेश दिले आहेत.या गुंडांना वॉरंट बजावून प्रत्यक्ष हद्दपारीची कारवाई करण्याचे काम तत्काळ सुरू केल्याची माहिती रायगडचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सुमंत भांगे यांनी ‘लोकमत’ला दिली. राज्यातील ही पहिलीच धडक कारवाई आहे.गेल्या पाच वर्षांपासून हद्पारीस योग्य असणाऱ्या १४१ गुंडांचे प्रस्ताव सुनावणी व निर्णयाअभावी प्रलंबित होते. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, हे लोकसभा निवडणूकीपूर्वी ‘लोकमत’ने सर्वप्रथम निदर्शनास आणले होते. त्यावर जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सुनावणी घेवून निर्णय देण्याचे आदेश सर्व संबंधीत उप विभागीय महसुल अधिकारी तथा दंडाधिकारी यांना दिले होते. त्यावर कारवाई न झाल्याने गुंड लोकसभा निवडणूक प्रक्रीयेत मोकाट राहीले होते. आता विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने हा गंभीर मुद्दा पुन्हा ऐरणीवर आणल्यावर, जिल्हाधिकारी भांगे यांनी सर्व संबंधीत उप विभागीय महसुल अधिकारी आणि दंडाधिकारी यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावली. कारवाई न झाल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश सोमवारी दिल्यावर मंगळवारी धडक कारवाई करण्यात आली. अलिबाग मतदारसंघात ५३ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तेथील निवडणूक निर्णय अधिकारी दीपक क्षिरसागर यांनी अलिबाग तालुक्यातील ३६, मुरुडमधील १७ जणांना हद्दपार करण्याचे आदेश दिले आहेत. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात १० जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. श्रीवर्धन विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तेजस समेळ यांनी १० गुंडांना हद्दपार करण्याचे आदेश दिले असून यामध्ये निवृत्त पोलीस सत्यवान पंढरीनाथ थळे, संतोष वेश्वीकर यांच्यासह शिवसेना आणि शेकापच्या कार्यकर्त्यांचा समावेश आहे. बुधवारी न्यायालयास सुटी असल्याने दाद मागणे दुरापास्त झाल्यामुळे राजकीय गोटात चिंतेचे वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांनी पसार होण्याचा मार्ग पत्करला आहे. या कारवाईमुळे मतदान निर्भय वातावरणात होण्याची आशा आहे.
रायगडमधील १३७ गुंड हद्दपार
By admin | Updated: October 15, 2014 04:10 IST