मुंबई - राज्य मार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या उत्पनामध्ये १३ टक्क्यांची वाढ झाली असून भाडेवाढी पूर्वीच्या आणि नंतरच्या १० दिवसांची सरासरी केली असता उत्पनामध्ये १३ टक्के म्हणजे ५१.७१ कोटी रुपयांनी वाढले आहे. दरम्यान या कालावधीत प्रवासी संख्येतही ६.६२ लाखांची वाढ झाली असल्याची माहिती महामंडळाने दिली आहे.
एसटी महामंडळाने २५ जानेवारीपासून तिकीट दरामध्ये १४.९५ टक्क्यांची वाढ लागू केली आहे. ही भाडेवाढ लागू होण्यापूर्वी महामंडळाला १० ते २४ जानेवारी या पंधरा दिवसांत ३३६ कोटी ४८ लाख इतके उत्पन्न मिळाले होते, तर भाडेवाढीनंतरच्या १५ दिवसांत म्हणजे २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारीपर्यंत ३८८ कोटी १९ लाख रुपये इतके उत्पन्न मिळाले आहे. यावरून दिवसाला सरासरी २५ कोटी ८७ लाख उत्पन्न मिळाले आहे जे भाडेवाढीपूर्वी २२ कोटी ४३ लाख इतके होते. एसटीने तिकीट भाड्यात केलेल्या वाढीन महामंडळाच्या उत्पन्नात भर घातली आहे.
नुकसान भरून निघणार महामंडळाने भाडेवाढ केल्यानंतर उत्पन्नामध्ये १०० कोटींची वाढ अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे असून यामधून एसटीला होत असलेले नुकसान काहीअंशी भरून काढण्यास मदत होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
महामंडळाने भाडेवाढ केल्याने उत्पनामध्ये वाढ झाली असली तरी ती अपेक्षित असल्याप्रमाणे नाही आहे, तसेच उत्पन्नातील वाढ कायम ठेवण्यासाठी पुरेशा गाड्या उपलब्धता असणे गरजेचे आहे. नोव्हेंबरनंतर येणाऱ्या नवीन स्वमालकीच्या २६४० पैकी आतापर्यंत फक्त २३८ गाड्या पुरवठादार कंपनीने दिल्या आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून गाड्या ताफ्यात लवकर येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, एसटी कर्मचारी काँग्रेस