लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : लग्नकार्यासाठी गेलेल्या कुटुंबावर पाळत ठेवून घरफोडी केल्याची घटना पनवेलमध्ये घडली आहे. या प्रकारात १३ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले आहेत. रातोरात तिजोरी साफ करून चोरट्यांनी पळ काढल्यानंतर सकाळी हा प्रकार उघडकीस आला.नेरे येथील सर्वोदयनगर परिसरात राहणाऱ्या निश्चल मधुकर माळी (४३), यांच्या घरी घरफोडी झाली आहे. सदर ठिकाणी ते सहकुटुंब राहायला आहेत. रविवारी हे संपूर्ण कुटुंब एका नातेवाइकाच्या लग्नकार्यासाठी गेले होते. याकरिता त्यांनी काही दिवसांपूर्वी बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेले दागिने घरी आणले होते. हे दागिने घालून ते लग्नासाठी गेले होते. लग्नकार्य उरकून परत आल्यानंतर त्यांनी अंगावरील दागिने काढून कपाटामधील लॉकरमध्ये ठेवले होते. सोमवारी सकाळी लॉकर असलेल्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे घरच्यांच्या निदर्शनास आले. यामुळे मधुकर यांनी घराबाहेर जाऊन खिडकीकडे पाहिले असता, ग्रील तुटल्याचे आढळून आले. त्याच ठिकाणातून त्यांनी आत जाऊन दरवाजा उघडून पाहिले असता, घरफोडी झाल्याचे निदर्शनास आले. अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील कपाट व तिजोरीचा टाळे तोडून त्या ठिकाणी घरफोडी केली. यामध्ये माळी यांच्या घरातील ३ लाख रुपये किमतीचे गंठन, १४ तोळे वजनाची ९ कर्णफुले, १ लाख रुपये किमतीचा हातातला कडा, बांगड्या, कानातील साखळी असे १३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ऐवज चोरीला गेले आहेत. त्याशिवाय माळी यांच्या समोरी बंगल्यातही अशाच प्रकारे घरफोडी झाल्याचे काही वेळाने उघड झाले; परंतु त्या ठिकाणी चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही. माळी कुटुंब लग्नकार्यासाठी दागिने परिधान करून गेले असता, चोरट्यांनी त्यांच्यावर पाळत ठेवून घरफोडी केल्याची शक्यता आहे. त्यानुसार दोन्ही घटनांची नोंद नवीन पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
पनवेलमधून १३ लाखांचे दागिने लंपास
By admin | Updated: June 6, 2017 02:31 IST