मुंबई : मराठवाड्यातील तब्बल १२९ सिंचन प्रकल्प निधीअभावी रखडल्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या या भागातील शेतकऱ्याला आशेचा किरण दिसत नाही. हे प्रकल्प कधी पूर्ण करणार, असा सवाल करीत सत्तारूढ आणि विरोधी पक्ष सदस्यांनी आज विधानसभेत सरकारवर हल्लाबोल केला. मराठवाडा दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. शेतकरी आणखी पिचला जात आहे. त्यामुळे सरकारने सिंचन प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सभागृहात सविस्तर चर्चा करावी, अशी मागणी सदस्यांनी केली. शिवसेनेचे अर्जुन खोतकर, शशिकांत खेडेकर, राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील, राजेश टोपे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आदींनी प्रश्नोत्तराच्या तासात सरकारला धारेवर धरले. मराठवाड्यातील अंतिम टप्प्यात कामे असलेल्या १५ प्रकल्पांना तातडीने निधी उपलब्ध करून वर्षभरात ते पूर्ण करण्यात येईल. तसेच उर्वरित प्रकल्पांची कामे त्यानंतर घेण्यात येतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी यावरील चर्चेला उत्तर देताना सांगितले. मात्र मंत्र्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने आमदार अत्यंत आक्र मक झाले. त्यांनी सविस्तर चर्चेचा आग्रह धरला. रखडलेल्या १२९ प्रकल्पांसाठीचा १२ हजार कोटी रुपयांचा निधी शासन किती दिवसांत देणार, असा सवाल खोतकर यांनी विचारला. त्यावर उत्तरादाखल महाजन म्हणाले की, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडील ८ मोठे, ७ मध्यम व ४९ लघू प्रकल्प असे एकूण ७१ प्रकल्प मराठवाड्यात बांधकामाधिन आहेत. (विशेष प्रतिनिधी)९०० कोटी रुपयांची आवश्यकता मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती व सिंचन सुविधांचा अभाव लक्षात घेता ज्या प्रकल्पांचे काम ७० ते ८० टक्के काम पूर्ण झालेले आहे, अशा अंतिम टप्प्यावर असलेल्या प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करण्यात येतील. मराठवाड्यात अशा विविध १५ प्रकल्पांसाठी ९०० कोटी रुपये लागणार आहेत. - गिरीश महाजन
मराठवाड्यातील १२९ सिंचन प्रकल्प रखडले
By admin | Updated: July 18, 2015 00:02 IST