सुनील भांडवलकर,
कोरेगाव भीमा- जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ३१ डिसेंबरअखेर संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा केलेल्या संकल्पाला आरोग्य विभाग व महिला व बालकल्याण विभागाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या असल्याने अद्याप जिल्ह्यात २ लाख ५४ हजार ३१० मुलांपैकी वजनानुसार १२४६ तीव्र कुपोषित व मध्यम कुपोषित १२,५५० मुले असल्याने जिल्हा परिषदेपुढे अद्याप कुपोषणमुक्तीचे आव्हान आहे.आॅगस्ट महिन्यात जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात १,५०० तर १३ हजारांपेक्षा जास्त मध्यम कुपोषित मुले होती. याबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रदीप कंद यांनी ३१ डिसेंबरअखेर संपूर्ण जिल्हा कुपोषणमुक्त करण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार जिल्ह्यात कमीअधिक प्रमाणात काम झाले; मात्र अपेक्षित यश न आल्याने जिल्ह्यात अद्यापही कुपोषित मुलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. याकडे गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता असून, जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभाग, एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, आरोग्य विभागाबरोबरच आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांनी कुपोषणमुक्तीवर जबाबदारीने काम करण्याची आवश्यकता आहे. पुणे जिल्हा हा औद्योगिक कारखानदारी व या कारखानदारीवर आधारित छोटेमोठे उद्योगधंदे तसेच जमिनींना मुबलक पाणीसाठ्यामुळे पुणे जिल्ह्यात नागरीकरणात झपाट्याने वाढ झाली आहेत. या भागात असलेल्या कुपोषित मुलांच्या एकूण टक्केवारीत ६० ते ७० मुले ही बाहेरील जिल्ह्यातील असून त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ग्रामबाल विकास केंद्र उभारून दिवसातून ६ वेळा असा महिनाभर सकस आहार देणे गरजेचा असते. मात्र, प्रत्यक्षात असे होताना दिसत नाही. पूर्वी बाळ कुपोषित असल्यास अंगणवाडी व घरामध्ये बाळकृष्ण कोपरा बनविण्यात येत असत. त्यामध्ये बाळाला खाण्यासाठी उकडलेली अंडी, शेंगदाना लाडू, चिक्की, खारीक, खोबरे, बिस्कीट ठेवण्यात येत असत. कुपोषित बालके असणाऱ्या अंगणवाड्यांमध्ये यापैकी काहीही मिळत नाही. >पुणे जिल्ह्यातील ४,६०३ केंद्रांतील २,६६,७३९ मुलांपैकी २,५४,३१० मुलांच्या घेतलेल्या वजनातून आंबेगाव तालुक्यात १३,११७ मुलांपैकी वजनानुसार तीव्र कुपोषित ९४, तर मध्यम कुपोषित ८६६, बारामती- २३,१७५ मुलांपैकी तीव्र कुपोषित ८५, तर मध्यम कुपोषित ९०८, भोर- १०,४५६ मुलांपैकी तीव्र कुपोषित ५१, तर मध्यम कुपोषित ५२७, दौंड- २३,२१६ मुलांपैकी तीव्र कुपोषित १२४, तर मध्यम कुपोषित १,००३, हवेली- ४१,३०२ मुलांपैकी तीव्र कुपोषित २७१, तर मध्यम कुपोषित २,०९२ , इंदापूर- २६,४७१ मुलांपैकी तीव्र कुपोषित ११२, तर मध्यम कुपोषित १,५३४, जुन्नर- २१,३२६ मुलांपैकी तीव्र कुपोषित ११३, तर मध्यम कुपोषित १,३४७, खेड- २७,०४३ मुलांपैकी तीव्र कुपोषित १३१, तर मध्यम कुपोषित १,३७९, मुळशी ११,७०६ मुलांपैकी तीव्र कुपोषित २३, तर मध्यम कुपोषित ४४४, पुरंदर- १०,९०१ मुलांपैकी तीव्र कुपोषित ५०, तर मध्यम कुपोषित ४८१, शिरूर- २१,७६५ मुलांपैकी तीव्र कुपोषित ८६, तर मध्यम कुपोषित ८४४, वेल्हे- २,८१६ मुलांपैकी तीव्र कुपोषित ३४ आहेत.>शिरूरमधील ८६ मुलांवर उपचारांची गरज शिरूर तालुक्यात ८६ कुपोषित मुले असून, त्यांना उपचारांसाठी पुण्यातील औंध रुग्णालयात दाखल करण्यासाठी पालकांचे प्रबोधन करण्यात आले होते.पालक उपचारांसाठी पुण्यात मुले ठेवण्याबाबत उसादीन असल्याने मुलांना कुपोषणमुक्त करण्यात अडसर येत असल्याचे शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी सचिन शिंदे यांनी सांगितले.>डिसेंबरअखेरच्या संकल्पाचे झाले काय?पूर्वी महिलांच्या गरोदरपणात वृद्ध महिला गरोदर महिलांना सुंठवडा, खारीक, खोबरे देत असल्याने या महिलांचे आरोग्य ठणठणीत राहण्यास मदत होत असे नि जन्माला येणारे बाळ आरोग्यदायी असे. मात्र, हल्ली महिलांच्या आरोग्याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने महिलांचे हिमोग्लोबिन १२-१३वरून ६-७वर आले आहे. त्यामुळे गरोदरपणात महिलांना उत्तम आहार न मिळाल्याने बाळ कुपोषित जन्माला येत आहे.डेक्कन चेंबर्सचा मदतीचा हात : पुणे-नगर रोड डेक्कन चेंबर्स आॅफ कॉमर्स या औद्योगिक कारखानदारांच्या समितीने शिरूर तालुक्यात कुपोषणमुक्तीसाठी पुढाकार घेण्याची ग्वाही चेंबर्सचे अध्यक्ष प्रकाश धोका यांनी दिली. तरीही पंचायत समितीचा महिला व बाल विकास विभाग व एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प यांनी पुढाकार घेतला नाही. पुणे जिल्हा संपूर्ण कुपोषणमुक्त करण्याचा जिल्हा परिषदेने संकल्प केला होता. मात्र अद्यापही १२४६ कुपोषित मुले असून त्यांच्यावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी बालविकास केंद्र सुरू करण्यासाठी ३० लाखांची तरतूद केली आहे. या मुलांना एकत्रित ठेवून पोषण आहार देण्यात येणार आहे. गरोदर स्तनदा मातांना सकस आहार देत कुपोषणमुक्तीसाठी काम करू. - प्रदीप कंद, अध्यक्ष जिल्हापरिषद