पुणे : इयत्ता बारावीच्या विज्ञान शाखेच्या गणित व रसायनशास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आले होते़ राज्य शिक्षण मंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत रसायनशास्त्राचे ४ आणि गणिताचे ७ गुण असे ११ गुण विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत दिली़ बारावीच्या गणित आणि रसायनशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकेत चुकीचे प्रश्न विचारण्यात आल्याचे शनिवारी उघडकीस आले होते़ विद्यार्थ्यांसह पालकांमधून तक्रार झाल्यानंतर मंगळवारी शिक्षण मंडळाच्या होणाऱ्या बैठकीत याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले होते़ त्यानुसार राज्य शिक्षण मंडळाच्या बैठकीत दोन्ही विषयांचे मिळून अकरा गुण विद्यार्थ्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला़ गणित आणि रसायन शास्त्र विषयाच्या प्रश्नपत्रिकेत चुका झालेले प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुण दिले जावेत, अशा सूचना पेपर तपासणाऱ्या शिक्षकांना मॉडरेटर्सच्या माध्यमातून देण्यात आल्याचे म्हमाणेंनी सांगितले़ (प्रतिनिधी)
बारावीच्या चुकीच्या प्रश्नांना मिळणार अकरा गुण!
By admin | Updated: March 11, 2015 01:43 IST