धक्कादायक! 'या' जिल्ह्यात महिन्याभरात ११८ बालकांचा मृत्यू; तरीही प्रशासनाला जाग नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2021 07:28 AM2021-10-21T07:28:13+5:302021-10-21T07:30:54+5:30

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे.

118 infant deaths in Nandurbar in a month due to malnutrition | धक्कादायक! 'या' जिल्ह्यात महिन्याभरात ११८ बालकांचा मृत्यू; तरीही प्रशासनाला जाग नाही

धक्कादायक! 'या' जिल्ह्यात महिन्याभरात ११८ बालकांचा मृत्यू; तरीही प्रशासनाला जाग नाही

Next

- रमाकांत पाटील

नंदुरबार : राज्यात सर्वाधिक कुपोषित बालके असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. हा मृत्यूदर राज्याच्या सरासरी दरापेक्षा दुप्पट असल्याने तो एक चिंतेचा विषय ठरला आहे. 

सप्टेंबरमध्ये जिल्ह्यातील १२ प्रकल्पांतर्गत एकूण दोन हजार ९९२ बालकांचा जन्म झाला, तर शून्य ते सहा वयोगटातील ११८ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्यात शून्य ते २८ दिवसांचे ३७, एक महिना ते एक वर्ष वयोगटातील ३८, एक वर्ष ते पाच वर्षे वयोगटातील २० आणि उपजत २३ बालकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर सहा मातांचाही मृत्यू झाला आहे. राज्यात एकीकडे शून्य ते सहा वयोगटातील बालकांचा मृत्यूदर सरासरी हजारी २१ आहे. मात्र, जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात या प्रमाणानुसार मृत्यूदर दुप्पट झाल्याचे चित्र समोर आले आहे. 

मृत्यू झालेल्या बालकांमध्ये नवापूर बालविकास प्रकल्पात सर्वाधिक म्हणजे २२ बालकांचा मृत्यू झाला आहे, तर तोरणमाळ प्रकल्पात १६, अक्कलकुवा प्रकल्पात १५ बालकांचा मृत्यू झाला आहे.

कुपोषित बालकांची संख्या कागदावरच घटवली जात असल्याची ओरड नेहमीचीच आहे. सर्वेक्षण होते तेव्हा बालकांची संख्या वाढते. ती दर महिन्याला कमी होत जाते. असा प्रकार आता पुन्हा सुरू झाल्याचे चित्र आहे. 

राज्यपालांच्या दत्तक गावातच तक्रार
राज्यपालांनी दत्तक घेतलेल्या भगदरी (ता. अक्कलकुवा) गावात चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविका येत नसल्याची, तसेच पोषण आहारही वितरित झाला नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. 
आरोग्य तपासणीच्या वेळेसही त्या अनुपस्थित असल्याच्या ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. 
यासंदर्भातील चौकशीसाठी स्थानिक अधिकारी गावात जाऊनही कुठलीही कार्यवाही झाली नाही.

Web Title: 118 infant deaths in Nandurbar in a month due to malnutrition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.