The 11-year-old Urli Patil of Sangli passed the Hamas, Sir, Vikrama's replay | सांगलीच्या ११ वर्षीय उर्वी पाटीलने हमता पास केला सर, विक्रमाची पुनरावृत्ती
सांगलीच्या ११ वर्षीय उर्वी पाटीलने हमता पास केला सर, विक्रमाची पुनरावृत्ती

ठळक मुद्देसांगलीच्या उर्वी पाटीलने केली ट्रेकींगच्या विक्रमाची पुनरावृत्ती११ वर्षाच्या उर्वीने पीरपंजाल रेंज मधील हमता पास केला सर

सांगली : कधी पाऊस तर कधी बर्फवृष्टी , कडाडणाऱ्या विजा आणि घोंगावणारा वारा अशा प्रतिकूल परिस्थितीत मुळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणा-या उर्वी अनिल पाटील या ११ वर्षाच्या मुलीने हिमालयातील पीरपंजाल रेंज मधील 14 हजार 400 फुटावरील हमता पास सर केला आहे. एवढया लहान वयात हमता पास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय कन्या ठरली असून मागील वर्षी उर्वीने अवघड असा सरपास ट्रेक पूर्ण केला होता.

उर्वीने आज नवी दिल्लीत महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली,
आमच्या हमता ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील रुमसू बेस कँप वरून 3 जून 2019 पासून झाली. पहिले दोन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. पुढे 5 जून पासून प्रत्यक्ष ट्रेक ला सुरुवात झाली. रुमसू हा 6 हजार 100 फुटावरचा बेस कँप असून पुढे चिक्का(8,100फुट), जुआरु(9,800 फुट) आणि बालुका गेरा(12,000 फुट) असे कॅम्प करत 14,400 फुटावरील हमता पास सर केला. दिवसाला 7 ते 8 तासांचा डोंगर-द-या आाणि बर्फातील हा प्रवास सलग पाच दिवसात पूर्ण करताना शारीरिक व मानसीक क्षमतेचा कस लागणार होता, असा अनुभव उर्वीने व्यक्त केला.

असा सर केला हमतापास

हमतापास हा कुलु आणि स्पिती व्हॅलीला जोडणारा जुना मार्ग आहे. मार्गावरून तेबिटीयन लोकांची ये-जा होते. या मार्गाला सिल्क मार्ग म्हणूनही ओळखले जाते. या ट्रेकिंगमध्ये बालुका गेरा ते रतनथळी व्हाया हमता पास हा ट्रेक सर्वाधीक अवघड होता.

बालुका गेरा ते प्रत्यक्ष पास पर्यंत 8 तासांचा प्रवास पूर्णतः बर्फामधील असून सुमारे 2,400 फुट प्रत्यक्ष चढाईचे होते. शिवाय 10 हजार फुटांनंतर ऑक्सिजनचे प्रमाणही कमी होते अशा प्रतिकूल परिस्थितीत सुरुवातीला पाऊस आणि पासवर बर्फवृष्टी असल्याने ट्रेक पूर्ण करताना दमछाक होत होती. पण, अशा अवघड पासवर पोहचल्याचा आनंदच काही और होता.

अशीही होती रिस्क 

साधारणपणे अशा प्रकारचे ट्रेक 16 वर्षांच्या युवक -युवतींसाठी असतात मात्र, उर्वीने मागील वर्षी वयाच्या 10 व्या वर्षी अत्यंत अवघड सरपास सर केला होता, त्यामुळे यावर्षी कैलास रथ या ऍडव्हेंचर ग्रुपने तिला आपल्या ग्रुपमध्ये सामावून घेतले. तयारी उपयोगी आली

हिमालयातील हमतापास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसीक व शारीरिक रित्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार , व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रीत केले. सकाळी दोन तास समुद्र किनारपट्टी वरील वाळूत चालायचे व अर्धातास योगा व खास जीम करायची.

आहारामध्ये प्रामुख्याने सी फुड व सुका मेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, ट्रेकींग बुट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वी ने आत्मविश्वासाने सांगितले. या ट्रेकसाठी आईस गाईड सुभाष राणा आणि मुंबईच्या केतन पटेल यांनी मदत केल्याचे उर्वी म्हणाली.एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय
अवघड अशा सरपास सह हमतापास सर केल्याने माझ्यातील आत्मविश्वास दुणावला आहे आणि जगातील सर्वात अवघड एवरेस्ट शिखर सर करण्याच्या दिशेने वाटचालीतील हे एक महत्वाचे पाऊल ठरेल व पुढील वर्षी पीन पार्वती आणि एवरेस्ट बेस कँप करण्याचे ध्येय आहे .
उर्वी  अनिल पाटील


Web Title: The 11-year-old Urli Patil of Sangli passed the Hamas, Sir, Vikrama's replay
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.