लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यानंतर त्यावरून महिनाभरात ११ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. तर एका महिन्यात या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनांच्या टोल वसुलीतून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या तिजोरीत ९० कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
नागपूर ते मुंबई हा प्रवास आठ तासांत पूर्ण करण्यासाठी सुमारे ६१ हजार कोटी रुपये खर्चून प्रवेश नियंत्रित असा समृद्धी महामार्ग उभारण्यात आला आहे. त्याची लांबी ७०१ किमी आहे.
दररोज ३७ हजार वाहनांचा प्रवाससमृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा ११ डिसेंबर २०२२ रोजी सुरू झाला. तेव्हापासून ३ जून २०२५ पर्यंत या महामार्गावरून २ कोटी १२ लाख वाहनांनी प्रवास केला होता, तर आतापर्यंत जवळपास २ कोटी २४ लाख वाहनांनी प्रवास केला आहे. तर सद्यस्थितीत या महामार्गावरून दररोज साधारपणे ३६ हजार ते ३७ हजार वाहने धावत आहेत.
राजधानी ते उपराजधानीची सफर नागपूर ते इगतपुरी हा ६२५ किमीचा मार्ग पूर्वीच सुरू झाला होता. तर इगतपुरी ते आमने हा ७६ किमीचा उर्वरित मार्ग ५ जूनपासून सुरू झाला. आता राजधानी आणि उपराजधानीची दोन्ही शहरे एकमेकांना थेट जोडली गेली आहेत. समृद्धीचा वापर करणाऱ्या वाहनांची संख्या आता वाढू लागली आहे. या महामार्गावरून ६ जून ते ६ जुलै या कालावधीत ११ लाख २३ हजार वाहनांनी प्रवास केला.
त्यामध्ये आमने येथील टोल नाक्यावरून १ लाख ९७ हजार वाहनांनी प्रवास केला, तर शहापूरजवळील खुटघर येथील टोलनाक्यावरून २७,६१२ वाहनांनी प्रवास केला. या कालावधीत आमने टोलनाक्यावरून १९ कोटी २० लाख रुपयांचा, तर खुटघर टोलवरून ९८ लाख रुपयांचा महसूल जमा झाला, अशी माहिती ‘एमएसआरडीसी’च्या अधिकाऱ्यांनी दिली.