यंदा उन्हाळा अधिक प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे जीव व्याकूळ होत आहे. अशा परिस्थितीत पक्ष्यांची पाण्यासाठी भटकंती होत असते. झाडावर असलेल्या घरट्यातील पिलांचा सांभाळ करण्यासाठी पक्ष्यांचा आटापिटा सुरू असतो. काही वेळेस अन्न मिळेल; पण इवल्याशा चोचीने पाण्याचे छोटे-छोटे घोट घेण्यासाठी पक्ष्यांना खूप त्रास होतो. पक्ष्यांचा होणारा हा त्रास पाहून पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी स्वखर्चातून येळण्या खरेदी करून त्या पोलीस ठाण्याच्या परिसरातील निलगिरी, गुलमोहराच्या एकूण २१ झाडांवर बांधल्या आहेत. त्यात दररोज सकाळी, दुपारी व सायंकाळी तीनवेळा पाणी टाकण्याची सोय केली आहे. येळण्यांमुळे पाणी थंड राहून पक्ष्यांच्या पाण्याची सोय झाली आहे. त्यामुळे सतत पक्षी तिथे पाहावयास मिळतात. तसेच ठाणे परिसरात पक्ष्यांचा किलबिलाट ऐकावयास मिळत आहे.
येळणीत पाणी टाकावे...
सध्या उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरात पक्ष्यांसाठी येळण्या बांधून पाण्याची सोय करावी. तसेच विविध कामानिमित्ताने ग्रामीण भागातून आलेल्या नागरिकांनी सोबतचे शिल्लक पाणी अन्यत्र टाकून न देता झाडावर बांधलेल्या येळणीत टाकावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम यांनी केले आहे.