चाकूर : चाकुरातील कोविड रुग्णांवर उपचारासाठी कृषी महाविद्यालयाची संपूर्ण इमारत गतवर्षीपासून आरोग्य विभागाने ताब्यात घेतली आहे. दरम्यान, बाधितांची संख्या लक्षात घेत येथे डेडिकेटेड हेल्थ सेंटरचा स्वतंत्र विभाग सुरु करण्यात येणार आहे. तिथे तात्पुरत्या सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यासाठी आर्थिक खर्च होत आहे. दरम्यान, येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ट्रॉमा केअर सेंटरची उभारणी सुरू असून सदरील कामास गती नसल्याने कामाची मुदतही संपुष्टात आली आहे.
गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासनाने येथील कृषी महाविद्यालयाची इमारत ताब्यात घेऊन कोविड सेंटर सुरु केले. त्यात सुमारे ४ हजार ६६४ रुग्णांवर उपचार करण्यात आले. तालुक्यातील रुग्णांवर उपचारासाठी डेडिकेटेड हेल्थ सेंटरची सुरुवात ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. आता कृषी महाविद्यालयातील एका इमारतीत स्वतंत्रपणे ती सुरु करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑक्सिजन पुरवठ्याचे काम एका एजन्सीमार्फत सुरु करण्यात आले आहे. ऑक्सिजन पातळी ९० ते ९४ पर्यंत असलेल्या रुग्णांवर येथे उपचार केेले जाणार असून त्यापेक्षा कमी ऑक्सिजन पातळी झालेल्या रुग्णांना उदगीर, लातूर येथे पाठवावे लागणार आहे.
या सेंटरमध्ये पोर्टिबल एक्स- रे मशीन, स्ट्रेचर्स, वीजपुरवठा खंडित झाल्यास जनरेटर, रुग्णांसाठी लॉकर्स, चार एमबीबीएस डॉक्टर, ४ वाॅर्डबॉय, ५ परिचारिका पाच उपलब्ध करुन देण्याची मागणी करण्यात आली आहे. आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर हे सेंटर रुग्णांसाठी सुरु होणार आहे. त्यासाठी आर्थिक खर्च मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाली. या डेडिकेटेड हेल्थ सेंटरमधील ५ खाटा बालकांसाठी आरक्षित राहणार आहेत.
येथील ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात ऑक्टोबर २०१९ पासून ट्रॉमा केअरच्या निर्मितीस सुरुवात झाली आहे. त्यासाठी ४ कोटी ९ लाखांचा खर्च केला जात आहे. हे काम २६ मार्च २०२१ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु, इमारत उभारणीचे काम संथ गतीने सुरु आहे. याकडे वेळीच प्रशासनाने लक्ष दिले असते तर काम पूर्ण झाले असते आणि रुग्णांवर उपचार सुरु झाले असते. या कामावर मार्च २०२१ अखेर १ कोटी ६८ लाखांचा खर्च करण्यात आला आहे. लेंटल लेव्हलला हे काम आले आहे.
ट्रॉमा केअर सेंटरच्या कामात प्रशासनाने लक्ष देऊन गती दिल्यास पाच ते सहा महिन्यात ही इमारत उभी राहील. त्यामुळे नव्या इमारतीत अत्याधुनिक सुविधा रुग्णांच्या सेवेसाठी मिळू शकतात. त्याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
ट्रॉमा केअर सुरु करण्यासाठी प्रयत्न...
ट्रॉमा केअर सेंटरचे काम गतीने होण्याची गरज आहे. त्याचा आढावा घेऊन रुग्णांसाठी ट्रॉमा केअर सेंटर लवकर सुरु करण्याकरिता प्रयत्न करणार आहे.
- आमदार बाबासाहेब पाटील.
सुविधा उपलब्ध केली जाईल...
शासन जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य विभागात लागणारी सर्व सुविधा मागणीप्रमाणे उपलब्ध करुन देत आहे. चाकूर येथील रुग्णांसाठी लागणारी कोणतीही सुविधा निश्चित उपलब्ध करुन दिली जाईल.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक.
यंत्रसामुग्रीची मागणी...
कृषी महाविद्यालय येथे कोविड सेंटर सुरु आहे. त्याच इमारतीत डेडिकेटेड हेल्थ सेंटरचा स्वतंत्र विभागात सुरू करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. ते सुरु करण्यासाठी व सेवेसाठी बरेच साहित्य लागणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाकडे मागणी केली आहे. त्याची पूर्तता करून रुग्णांवर उपचार केले जातील.
- डॉ. दीपक लांडे, वैद्यकीय अधीक्षक.
जलद गतीने काम करण्यात येईल...
गतवर्षी आणि यंदा कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे कामाचा वेग मंदावला होता. इमारत उभी करण्यासाठीची मुदत संपुष्टात आली आहे. ती वाढवून घेऊन काम गतीने पूर्ण करण्यात येईल.
- अनिल कांबळे, शाखा अभियंता, सा.बां. उपविभाग.