निलंगा : अक्का फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी कार्य केल्याने मला ही संधी मिळाली आहे. त्याचा सदुपयोग करत सर्वसामान्यांच्या हितासाठी अविरतपणे काम करत राहणार असल्याचे भाजपचे नूतन प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांनी सांगितले.
अरविंद पाटील निलंगेकर यांची भाजप प्रदेश सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील चौकाचौकात फटाक्यांची आतषबाजी करुन पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
यावेळी अरविंद पाटील निलंगेकर म्हणाले, अक्का फाऊंडेशनच्यावतीने उपजिल्हा रुग्णालयात आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करुन देण्यात आली. १२ हजार दिव्यांगांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले. राज्यस्तरीय आरोग्य शिबिरही घेण्यात आले. निलंग्यात हरित शिवजयंती, सांस्कृतिक कार्यक्रमांतून शहरवासीयांना बौद्धिक व सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध करुन दिली. गोरगरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, नाला सरळीकरण असे विविध उपक्रम राबविले. माजी खासदार तथा आई रूपाताई पाटील निलंगेकर, ज्येष्ठ बंधू, माजी मंत्री तथा आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील राजकीय वाटचाल करणार असून, सर्वसामान्यांच्या हितासाठी काम करत राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या निवडीबद्दल त्यांचे नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, जिल्हा परिषद सदस्य संजय दोरवे, अमीर पटेल, गजानन देशमुख, तानाजी पाटील, अभिजित सोळुंके यांनी अभिनंदन केले. तसेच चौकाचौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला. यावेळी तम्मा माडीबोणे, प्रशांत पाटील, अर्जुन पौळ, सुमीत ईनानी, अविनाश बिराजदार, निशांत पाटील, सौरभ नाईक, शुभम वाघमारे, दिगंबर कळसे, आदी उपस्थित होते.