लातूर : शासनाच्या कृषिविषयक योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे मिळावा, यासाठी महाडीबीटी पोर्टलवर एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. अनुदानित बियाणांसाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार अंंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यात २७ हजार ४२ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये सोयाबीनसाठी सर्वाधिक २३ हजार १९४ प्रस्ताव आले असून, अनुदानित बियाणे मला मिळणार का भाऊ? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवर शेतकरी योजना या शीर्षकांतर्गत बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्जाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेअंतर्गत लाभार्थ्यांना राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी आदी बियाणे अनुदानावर उपलब्ध होणार आहेत. यासाठी महाडीबीटी पोर्टलवर नाेंदणी करणे बंधनकारक होते. अंतिम मुदतीपर्यंत जिल्ह्यातील २७ हजार ४२ जणांनी अर्ज केले आहेत. आता लॉटरी पद्धतीतून शेतकऱ्यांची निवड केली जाणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
जिल्ह्यात २७ हजार अर्ज
राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत कृषी विभागाने महाडीबीटी हे पाेर्टल विकसित केले आहे. अनुदानित बियाणांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. कोरोना काळात अर्ज सादर करताना शेतकऱ्यांना गैरसोयींचा सामना करावा लागला. १५ मेपर्यंत अर्ज करण्यास मुदत होती. मात्र, शेतकऱ्यांचा प्रतिसाद पाहता, या योजनेला मुदतवाढ देण्यात आली होती. अंतिम तारखेपर्यंत जिल्ह्यातील २७ हजार ४२ शेतकऱ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.
एसएमएस आला तरच मिळणार अनुदानित बियाणे...
लॉटरी पद्धतीने निवड केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना एसएमएस मिळणार आहेत. याशिवाय तालुकास्तरावर निवड केलेल्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यानुसार अनुदानित लाभ निवडपात्र शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्यावतीने सांगण्यात आले.
अर्ज केलेले शेतकरी म्हणतात...
यंदा इतर कंपन्यांच्या बियाणांच्या बॅगची किंमत वाढली आहे. त्यामुळे महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज केला आहे. आता सोडतीकडे लक्ष लागले आहे. कंपनीचे बियाणे आणि शासकीय बियाणे दरामध्ये मोठा फरक आहे. सोबतच शासकीय बियाणे खात्रीशीर असते. त्यामुळे बियाणे या घटकासाठी अर्ज केला आहे. यादी लागल्यावर निवड होते की नाही ते कळेल.
- धनंजय जाधव, शेतकरी, जेवळी
अनुदानित बियाणे मिळावे याकरिता कृषी विभागाने ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनला सर्वाधिक पसंती दिली आहे. मी देखील सोयाबीनसाठी अर्ज भरला आहे. त्यामुळे निवडीकडे लक्ष आहे. लवकरात लवकर सोडत जाहीर करावी.
- महादेव पांडे, शेतकरी, नागझरी
सोयाबीन, तुरी बियाणाला सर्वाधिक पसंती...
कृषी विभागाने अनुदानित बियाणांसाठी अर्ज मागविले होते. त्यामुळे सिंचन साहित्य, यांत्रिकीकरण यासह अन्य योजनांचा उल्लेख अर्जामध्ये करता आला नाही. जिल्ह्यात सोयाबीन प्रमुख पीक असल्याने सर्वाधिक २३ हजार १९४ अर्ज सोयाबीनसाठी आले आहेत. त्यासोबतच तुरीसाठी २ हजार ६३३, मुगासाठी ६१६, तर उडिदासाठी ५९९ अर्ज दाखल झाले आहेत. खरीप हंगामात सोयाबीनचा सर्वाधिक पेरा होणार असून, कृषी विभागाच्यावतीने ५ लाख ९३ हजार हेक्टरवरचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये ४ लाख ५० हजार हेक्टरवर सोयाबीन अपेक्षित आहे. त्यामुळे सोयाबीनसाठी सर्वाधिक अर्ज आले आहेत.
कोणत्या बियाणासाठी किती अर्ज आले...
सोयाबीन - २३,६३३
तूर - २,६३३
मूग - ६१६
उडीद - ५९९
एकूण अर्ज - २७,०४२