लातूर : शेतजमीन नांगरण्याच्या कारणावरून रेणापूर तालुक्यातील फावडेवाडी शिवारात गट नंबर १८० मध्ये दोन गटांत मारहाण झाल्याची घटना घडली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
तू आमची जमीन का नांगरलीस म्हणून शिवीगाळ करून अफजल रहेमान शेख व अन्य सातजणांनी फिर्यादी अंबीरखाँ वजीरखाँ पठाण (रा. काझीमोहल्ला, पानगाव, ता. रेणापूर) व त्यांच्या मुलास काठीने मारहाण केली. फिर्यादीच्या डाव्या हातावर काठीने मारून त्याला जखमी केले.मुलाला व नातवालाही मारहाण करून जखमी केले. जिवे मारण्याची धमकी दिली, अशी फिर्याद अंबीरखाँ वजीरखाँ पठाण यांनी रेणापूर पोलिसांत दिली. त्यावरून अफजल रहेमान शेख (रा. कोंद्री, ता. गंगाखेड) व अन्य सातजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावळे करीत आहेत.
दरम्यान, फावडे शिवारात गट नंबर १८० मधील आमचे शेत का नांगरले असे विचारले असता फिर्यादी जरीनाबी दौलतखॉं शेख यांना काठीने मारहाण करण्यात आली. यावेळी फिर्यादीचे जावई भांडण सोडविण्यासाठी आले असता त्यांनाही काठीने मारून जखमी केले. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मिरचीची पूड डोळ्यांत टाकून जिवे मारण्याची धमकी दिली, असे जरिनाबी शेख यांनी रेणापूर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अंबीरखॉं वजीरखॉं पठाण व अन्य पाचजणांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सावळे करीत आहे.