जिल्ह्यात कोरोनाने अद्यापर्यंत २ हजारांहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ तर दुसऱ्या लाटेत प्रौढांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक होते. परिणामी, अनेक बालकांनी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला गमावले आहे. पालक गमावलेल्या बालकांचे शिक्षण आणि संगोपन व्हावे, यासाठी राज्य शासनाच्या निर्देशानुसार महिला व बालविकास विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १७७ बालकांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने या मुलांचे पालकत्व स्वीकारले जाणार आहे. मात्र, प्रत्यक्षात अद्याप मदत झालेली नसल्याचे जिल्ह्यातील चित्र आहे.
जिल्ह्यातील कोविडच्या रुग्णांचा आढावा...
जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण रुग्ण : ८९,१६५
कोरोनाचे बरे झालेले रुग्ण - ८५,३१८
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण : १,६५२
कोरोनामुळे एकूण मृत्यू - २,१९५
सर्वेक्षणात आढळले १७७ बालके...
राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार महिला व बालविकास विभागाच्यावतीने जिल्ह्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये १७७ बालके आढळले आहेत. ज्यांनी आई किंवा वडील या दोघांपैकी एकाला गमावले आहे. त्यामध्ये १०० मुले तर ७७ मुलींचा समावेश आहे. एका मुलाने तर आई आणि वडील या दोघांनाही गमावले आहे. दरम्यान, सर्वेक्षणात आढळणाऱ्या मुलांची संपूर्ण कौटुंबीक माहिती एकत्रित केली जाणार आहे. ज्या मुलांची परिस्थिती बिकट आहे, सांभाळ करणारेही कोणी नाही अशी परिस्थिती असेल तर त्या बालकास बालसमितीच्या माध्यमातून पर्याय उपलब्ध करून दिले जाणार आहेत.