सध्या केवळ एकच रेल्वे सुरू...
लातूर रेल्वेस्थानकातून लातूर-यशवंतपूर ही एकच रेल्वे सध्या सुरू आहे. दरम्यान, इतर रेल्वे सुरू करण्याबाबत निर्णय झालेला नाही. त्याबाबत वरिष्ठ कार्यालयातून सूचना मिळताच इतर रेल्वेसेवा सुरू करण्यात येतील असे, लातूर रेल्वेस्थानक कार्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, वरिष्ठ कार्यालयाचा निर्णय होईपर्यंत प्रवाशांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
या गाड्या कधी सुरू होणार...
लातूर-मुंबई
हैदराबाद-पुणे
अमरावती -पुणे
नांदेड-पनवेल
या रेल्वे बंदच आहेत. त्यामुळे या रेल्वे सुरू करण्याची मागणी लातूर जिल्ह्यातील प्रवाशांमधून होत आहे. या रेल्वेसेवा बंद असल्याने इच्छित ठिकाणी जाण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्स आणि एसटी बसेसचा आधार घ्यावा लागत आहे.
कोरोनाच्या काळात प्रवाशांचा अल्प प्रतिसाद...
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे एसटी, रेल्वे आणि इतर प्रवासी सेवा बंदच होती. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागला.
आता परिस्थिती पूर्वपदावर येत असून, अनलॉक करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांना कामासाठी इतर शहरात जावे लागते. मात्र, रेल्वेच बंद असल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
लातूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने लातूर-मुंबई रेल्वे सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.
प्रवासी काय म्हणतात...
कोरोनामुळे बाहेरगावी जाणे बंद होते. आता परिस्थिती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे मुंबईला जाण्यासाठी रेल्वेची विचारणा केली. ही रेल्वे बंद असल्याने खासगी वाहनाची मदत घ्यावी लागली. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता रेल्वे सुरू करण्यात यावी. - मोहन बनसोडे, प्रवासी
लातूर-मुंबई सोबतच हैदराबाद पुणे रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद असतो. रेल्वे बंद असल्याने गैरसोय होत आहे. रेल्वे प्रशासनाने गैरसोय लक्षात घेऊन रेल्वेसेवा सुरू करावी. ज्यामुळे गैरसोय दूर होण्यास मदत होईल. -विशाल वगरे, प्रवासी