लोकमत न्यूज नेटवर्क
उदगीर : शहरातील नांदेड - बिदर राज्य मार्गावरील गटसाधन केंद्राच्या परिसरात विविध कार्यालये आहेत. या परिसरात पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात परिसराला तळ्याचे स्वरुप येते. त्यामुळे चिखल निर्माण होतो. यामुळे नागरिकांसह वाहनधारकांना कसरत करत पाणी व चिखलातून वाट काढावी लागत आहे.
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पालिकेच्या व्यापारी संकुलासमोर पंचायत समिती सभागृह, गटसाधन केंद्र, महिला समुपदेशन व मदत केंद्र, लघु पाटबंधारेचे उपविभागीय कार्यालय, एकात्मिक महिला व बालकल्याण, शासकीय आधार नोंदणी कार्यालयासह व्हॉलिबॉलचे दिवस-रात्र सामने खेळविण्यासाठीचे मैदान आहे. मात्र, या परिसरातील पाण्याचा निचरा होत नसल्याने दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
गटसाधन केंद्रातून तालुक्यातील शाळांचे कामकाज चालते. याठिकाणी कामानिमित्त दररोज शिक्षकांसह पालक, मुख्याध्यापकांची रेलचेल असते. तसेच येथील पंचायत समिती सभागृहात नेहमी कार्यक्रम, बैठका होतात. महिला समुपदेशन केंद्र व मदत केंद्र, एकात्मिक महिला व बालकल्याण कार्यालय असल्याने अंगणवाडीताई, मदतनीस व आशा कार्यकर्त्यांसह महिलांची दररोज ये-जा असते. या परिसरात पावसाच्या पाण्यामुळे चिखल निर्माण झाला आहे. शासकीय कामानिमित्त दररोज ये-जा करणाऱ्यांना यामुळे कसरत करावी लागत आहे.
अधिकाऱ्यांचे होतेय दुर्लक्ष...
या परिसरात साचत असलेल्या पावसाच्या पाण्याला राज्य मार्गावरील संरक्षक भिंतीच्या बाजूने नाला काढून दिल्यास पाण्याचा निचरा होऊ शकतो आणि दलदल नाहीशी होऊ शकते. याशिवाय हा परिसर व येथील व्हॉलिबॉलचे मैदान पाण्यापासून वाचणार आहे. परिसरात विविध कार्यालये असूनही अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष हाेत असल्याने सामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
आधार नोंदणीमुळे सतत रेलचेल...
दरवर्षीच्या पावसाळ्यात या परिसरात अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी व कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना चिखलाच्या दलदलीतूनच वाट काढावी लागते. येथून कसरत करत मार्गक्रमण करावे लागत आहे. याठिकाणी आधार नोंदणी कार्यालय असल्याने आबालवृध्द येथे येतात. त्यासाठी संबंधितांनी लक्ष देऊन तत्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी कारवॉचे गुरूप्रसाद पांढरे यांनी केली आहे.