शिरूर अनंतपाळ : शहरातील मुख्य सिमेंट रस्त्याचे काम दर्जेदार झाले नसल्याने रस्त्यात काही ठिकाणी चढ तर काही ठिकाणी सखल भाग झाला आहे. त्यामुळे थोडासाही पाऊस झाला की मुख्य रस्त्यावर जागोजागी तळे साचत आहे. परिणामी, रहदारीस अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे.
शिरूर अनंतपाळ शहरातून जाणाऱ्या राज्य मार्गावरील वाहतूक दुहेरी व्हावी म्हणून दुभाजकाचे बांधकाम करण्यात आले आहे. दोन्ही बाजूंनी सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. सिमेंट रस्त्यावर काही ठिकाणी उंचवटा तर काही ठिकाणी खोलगट भाग झाला आहे. परिणामी, भुरभुर पाऊस झाला तरीही खोलगट भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. त्याचा वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शिवाय, पाण्याचा अंदाज येत नसल्यामुळे अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यास वळण घेत अनेक जण एकेरी मार्गाचा वापर करीत आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूला वळताना दुचाकी, तीनचाकी, चारचाकी, वाहने स्लिप होत आहेत. शहरातून
जाणाऱ्या सिमेंट रस्त्याचे काम दर्जेदार करण्यात यावे, अशी नागरिक, प्रवाशांची मागणी होत आहे.
सार्वजनिक बांधकामचे दुर्लक्ष...
शहरातून जाणारा राज्यमार्ग असल्याने सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अखत्यारित येतो. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम उपविभागाने अभियांत्रिकी कौशल्य वापरून हा रस्ता तयार करणे गरजेचे आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सा.बां. उपविभागाने लक्ष देऊन सिमेंट रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.
रस्त्याच्या दुतर्फा गटारीची गरज
मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूने गटारीचे बांधकाम झाले तर सिमेंट रस्त्यावरील सखल भागात थांबणारे पाणी वाहून जाऊ शकते आणि नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. परंतु, मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारीचे बांधकाम अर्धवट झाले असल्याने जागोजागी तळे साचत आहे.
गटारीच्या बांधकामास मंजुरी
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रवींद्र पवार म्हणाले, सिमेंट रस्त्याच्या दुतर्फा एक किमी गटारीच्या बांधकामास मंजुरी मिळाली असून, कार्यारंभ आदेश मिळताच बांधकाम सुरू होईल.