चाकूर तालुक्यातील तहानलेल्या गावांचे अधिग्रहण प्रक्रिया मंजूरीच्या प्रतिक्षेत
रखरखत्या उन्हात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती
संदीप अंकलकोटे,
चाकूर : तालुक्यातील १० गावे व २ वाडी- तांड्यावर पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. विहीर, बोअर अधिग्रहण करण्यासाठीचे प्रस्ताव दाखल करण्यात आले असले तरी मे महिन्याचा शेवटचा आठवडा संपत आला असतानाही प्रस्तावांना अद्याप मंजुरी मिळाली नाही. त्यामुळे घागरभर पाण्यासाठी ग्रामस्थांना शिवारात रखरखत्या उन्हात भटकंती करावी लागत आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे बहुतांश नागरिक घरीच आहेत. त्यामुळे पाण्याचा वापर वाढला आहे. तालुक्यातील झरी (बु.) येथील दोन विहिरींच्या अधिग्रहणाचा प्रस्ताव २५ मार्च रोजी पंचायत समितीने तहसील कार्यालयाकडे पाठविला. तब्बल दोन महिने उलटले तरी अद्यापही अधिग्रहणाचा प्रस्ताव मंजूर झाला नाही. बोरगाव (बु.) बोअर अधिग्रहणासाठी २६ एप्रिल, वडगाव एक्की, कडमुळी, अजनसोंडा (बु.) येथील विहीर अधिग्रहणासाठीचे चार प्रस्ताव २४ मे रोजी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले. तसेच ब्रह्मवाडी, नागरवाडी, झरी (खु.), ब्रह्मवाडी (येनगेवाडी) साठी विहीर व बोअरसाठीचे प्रस्ताव २५ मे रोजी पाठविण्यात आले. प्रस्ताव मंजूर होण्यासाठी वेळ लागत असल्याने अधिग्रहण प्रक्रिया रखडली आहे. त्यामुळे ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
महसूलकडून दुर्लक्ष...
महसूल विभाग जाणिवपूर्वक प्रस्ताव स्वीकारत नाही. प्रस्ताव पाठवू नका, असे आमच्या कर्मचाऱ्यास तहसीलकडून सांगितले जात आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी अधिग्रहणासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी पंचायत समितीचे उपसभापती सज्जनकुमार लोणाळे यांनी केली आहे.
एसडीओंकडे प्रस्ताव...
पंचायत समितीकडून अधिग्रहण प्रस्ताव आले. त्यावर संयुक्त पाहणी करण्यात येत आहे. त्यानंतर हे प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्याकडे पाठविण्यात येतील. त्याला मंजुरी मिळाल्यावर अधिग्रहण प्रक्रिया केली जाणार आहे.
- डॉ. शिवानंद बिडवे, तहसीलदार.