तालुक्यातील विविध गावांत वारकरी सांप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. आषाढी एकादशीनिमित्ताने पायी वारीस जाणाऱ्या भाविकांची संख्याही अधिक आहे. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाही पायी वारीस परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे वारकऱ्यांचा हिरमोड झाला आहे. शुक्रवारी दुपारी विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय वारकरी परिषद यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर वारकऱ्यांनी आंदोलन केले. दारू दुकानास परवानगी देण्यात आली, पण पायी वारीस का नाही, असा संतप्त सवालही वारकऱ्यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी विहिंपचे गायकवाड, राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंद श्रीमंगले, बजरंग दलाचे बळीराम महाराज शिवपूरकर, तानाजी महाराज आरीकर, सरोजा गायकवाड, रामराव पाटील यांच्यासह वारकरी उपस्थित होते.
टाळ- मृदंगाच्या गजरात माऊलींचा जयघोष...
तहसील कार्यालयासमोर वारकऱ्यांनी आंदोलन करून वीणा, टाळ, मृदंगाच्या गजरात भजन म्हटले. तसेच माऊली, माऊली असा जयघोष केला. त्यामुळे तहसील कार्यालय परिसर माऊलींचा निनाद सुरू होता.