संदीप शिंदे,
लातूर : कोरोनाच्या काळात सर्व काही ‘लॉकडाऊन’असले तरी स्वयंपाकासाठी आवश्यक असलेला गॅस ‘अत्यावश्यक सेवा’ म्हणून घरपोच अविरतपणे पोहोचविला जात आहे. हा गॅस घरपोच करण्यासाठी दररोज अनेकांच्या संपर्कात येत असलेल्या गॅस कर्मचाऱ्यांना मात्र लसीकरणाचे कवच अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे घरपोच गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात ४० गॅस एजन्सी असून, यामध्ये ५ लाख ५० हजार ग्राहकांना नियमित गॅसचा पुरवठा केला जातो. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या १ हजार १०० असून, यापैकी एकही कर्मचाऱ्याला अद्याप कोरोनाच्या लसीकरणाचा डोस देण्यात आलेला नाही. ‘अत्यावश्यक सेवे’मध्ये येत असून, गॅस कर्मचाऱ्यांना लसीकरण झालेले नाही. एजन्सी चालक संघटनेच्या वतीने प्रशासन, राज्य आणि केंद्र सरकारकडे याबाबत पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत आहे. गॅस वितरण करणारे कर्मचारी दररोज अनेकांना घरपोच गॅसचे वितरण करत आहे. त्यामुळे गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाने तत्काळ गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यातील एकूण गॅस ग्राहक - ५,५००००
जिल्ह्यातील एकूण गॅस एजन्सी -४०
घरपोच गॅस वितरण करणारे कर्मचारी - १,१००
पहिला डोस घेतलेले कर्मचारी - ००
दुसरा डोस घेतलेले कर्मचारी - ००
एकही डोस न मिळालेले कर्मचारी -१,१००
सिलिंडर देताना घेतली जाते काळजी...
घरपोच गस वितरण करताना कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना गॅस एजन्सीच्या वतीने देण्यात येत आहे. त्यानुसार मास्क, फिजिकल डिस्टन्स आणि सॅनिटायझर आदी नियमांचे काटेकोर पालन करत घरपोच गॅस वितरित केला जात आहे. विशेष म्हणजे ग्राहकांच्या वतीनेही पूर्ण काळजी घेतली जात आहे.
लसीकरण करण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा...
गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण तत्काळ करण्यात यावे, यासाठी गॅसएजन्सी चालक संघटनांच्या वतीने केंद्र आणि राज्य सरकार तसेच जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटकाळातही कर्मचारी अविरतपणे सेवा बजावत आहेत. सर्वाधिक कर्मचारी १८-४४ वयोगटांत मोडतात. त्यामुळे त्यांचे लसीकरण करण्याची मागणी होत आहे.
गॅस एजन्सी चालक म्हणतात...
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाचे संकट आहे. या काळात घरपोच गॅस वितरण करणारे कर्मचारी सेवा देत आहेत. काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. उपचारानंतर बरेही झाले आहेत. मात्र, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा विचार करता लसीकरण करणे गरजेचे आहे.
- भूषण दाते, गॅस एजन्सी चालक, लातूर
ग्रामीण भागातही घरपोच गॅस वितरण केले जात आहे. कर्मचारी १८-४४ वयोगटांतील असून, त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेणे गरजेचे आहे. दररोज अनेकांशी संपर्क येत असल्याने लसीकरण हाच पर्याय आहे. यावर तत्काळ निर्णय व्हावा.
-अजय शेळके, गॅस एजन्सी चालक, मुरूड अकोला.
लसीकरणाबाबत नियोजन सुरू...
घरपोच गॅस वितरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण करावे, याबाबत प्रशासनाच्या वतीने निर्णय घेण्यात येत आहे. आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकीत्सक आणि स्थानिक स्तरावर तहसील कार्यालयाला सूचित करण्यात आले आहे. लवकरच या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले जाईल, असे जिल्हा पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.