औसा तालुक्यातील लामजना ते तपसे चिंचोली रस्त्यानजीक नालीचे काम दोन महिन्यांपूर्वी झाले आहे. सदरील काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नालीवर पुन्हा भगदाड पडले आहे. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. तसेच पादचा-यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. सदरील काम चांगल्या पध्दतीने करण्यात यावे, अशी मागणी करीत सोमवारी येथील नागरिकांनी हे काम अडविले. यावेळी सरपंच खंडेराव फुलारी, ज्ञानेश्वर चिल्ले, शंकर शिंदे, अजमोद्दीन शेख, असलम शेख, चाँद शेख, संजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य नजीर पटेल उपस्थित होते.
संबंधित अधिका-यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित गुत्तेदारास चांगले काम करण्याच्या सूचना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या नालीवर मोठे भगदाड पडले आहे. या मार्गावर सतत वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी ये- जा करताना अपघात होण्याची भीती आहे, असे नागरिकांनी सांगितले.