कोरोनाच्या संकटामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच उन्हाळी सुटीच्या कालावधीत शिक्षकांना काही कामे देण्यात आली होती. त्यामुळे शिक्षक कोविड केअर सेंटर, गृहविलगीकरणातील बाधितांवर लक्ष ठेवणे, बीएलओ, सर्वेक्षण अशा विविध ठिकाणी करीत आहेत. या शिक्षकांना कामाच्या दिवशी कर्तव्यस्थळी जाण्यासाठी मासिक अनुक्रमे ४००, ६०० रुपये वाहनभत्ता दिला जातो. दिव्यांग शिक्षकांना २ हजार रुपये भत्ता दिला जातो. दरम्यान, ही रक्कम सुट्टीच्या कालावधीत कपात केली जाते.
यंदा कोरोनामुळे शिक्षकांना कर्तव्य स्थळी जावे लागत आहे. त्यामुळे मे आणि जूनचा वाहनभत्ता कपात न करता वेतनात समाविष्ट करावा, अशी मागणी शिक्षक काँग्रेसचे औसा तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार, दीपक चामे, सुरेश सुडे, संजय बिरादार, काकासाहेब ठोके यांनी निवेदनाद्वारे केली होती. तसेच सतत पाठपुरावा केला होता. अखेर शिक्षणाधिकाऱ्यांनी सदरील शिक्षकांचा वाहनभत्ता देण्याचे आदेश गटशिक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याबद्दल तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार, दीपक चामे, सुरेश सुडे, संजय बिरादार, काकासाहेब ठोके, प्रदीप ढेंकरे, अमोल राठोडे, गोविंद जगताप, चंद्रकांत तोळमारे, दयानंद वायदंडे, बालाजी सोनटक्के, सत्यनारायण वडे, शिवाजी चव्हाण, हणमंत जांबळदारे, डी. झेड. गायकवाड आदींनी समाधान व्यक्त केले.
वेतनात भत्ता मिळणार...
सुटीच्या कालावधीत कोविड काम केलेल्या शिक्षकांना वाहनभत्ता देण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळे त्यासंदर्भात केंद्रीय मुख्याध्यापकांना सूचना करण्यात आल्या आहेत, असे गटशिक्षणाधिकारी अनुपमा भंडारी यांनी सांगितले.
जिल्हाभरातील शिक्षकांना लाभ...
कोविड कालावधीत काम करणाऱ्या शिक्षकांना वाहनभत्ता देण्यात यावा, यासाठी वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे सदरील आदेश देण्यात आले आहेत. त्याचा जिल्हाभरातील कोविडचे काम केलेल्या शिक्षकांना लाभ होणार असल्याचे शिक्षक काँग्रेसचे औसा तालुकाध्यक्ष दयानंद बिराजदार म्हणाले.